राहुल गांधींकडून आरोपांच्या फैरी ! निवडणुकीत म्हणे, मतांची चोरी !!

गेले काही दिवस काँग्रेस नेते राहुल गांधी हे निवडणूक आयोगावर बेछूट आरोप करत सुटले आहेत. आरोप अंगलट आले की माफीनामा देण्यातही त्यांना कमीपणा वाटत नाही. जनतेमध्ये असलेला काँग्रेसचा मूलभूत पाया ढासळला आहे, हे त्यांना मान्य नाही, किंवा केंद्र सरकारच्या कामाला जनता पोचपावती देत आहे, हे मान्य करण्याचीही त्यांची दानत नाही !
बळकट लोकशाही निवडणूक आयोगामुळे..
जगामध्ये भारताच्या लोकशाहीचे कौतुक होत असते, निवडणुकीत यंत्रणेची पारदर्शकता, स्वच्छ कारभार कसा आहे हे पाहण्यासाठी जगातून लोक येतात आणि निवडणूक आयोगाला समजावून घेतात. थोडक्यात काय, भारतीय लोकशाहीची बिनचूक धुरा म्हणजे निवडणूक आयोग ! या संस्थेवर जनतेचा विश्वास टिकून आहे, कारण आपल्या येथील मतदान पारदर्शक, मुक्त आणि नि:ष्पक्षपणे पार पडते. मात्र, राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘हात दाखवून अवलक्षण’ केले आहे ! राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आणि मतदान प्रक्रियेवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रातील ४० लाख संशयास्पद मतदार, कर्नाटकमधील मतांची चोरी, आणि निवडणुकांचे ‘पूर्वनियोजन’ केल्याचा दावा.. हे सर्व आरोप जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणारे होते, हे मान्य त्यांचा खुलासा निवडणूक आयोग करेल. पण, त्यात तथ्य आहे का ?
राहुल यांचे आरोप गंभीर..पण?
राहुल यांचा पहिला मोठा आरोप म्हणजे महाराष्ट्रात ४० लाख ‘संशयित’ मतदार नावांची भर ! दुसरा आरोप कर्नाटकातील महादेवपुरा मतदारसंघात एक लाख मतांची चोरी, तिसरा आरोप, ईव्हीएम मशीन आणि मतदान यादीतील ‘हेरफेर’, त्यानंतर चौथा आरोप म्हणजे निवडणुका पूर्वनियोजित होणे म्हणजेच घडवून आणलेला निकाल !
महाराष्ट्रात मतदारांची वाढ..
राहुल गांधी म्हणतात, की महाराष्ट्रात अवघ्या पाच महिन्यांत ४० लाख नव्या मतदारांची नोंद झाली आणि ती ‘संशयास्पद’आहे. आता, याबाबत आयोगाचा अधिकृत अहवाल पाहू या. २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रात १८ वर्षे पूर्ण झालेल्या नव्या नागरिकांची संख्या सुमारे ३०-३५ लाख होती. प्रत्येक वर्षी ‘मतदार यादी विशेष सुधारणा मोहीम’ राबवली जाते, त्यात नवीन नोंदणी, मृत व्यक्तींची नावे वगळणे, स्थलांतरितांची नावे नोंदविणे, अशी पावले उचलली जातात. या प्रक्रियेसाठी आयोग खास प्रणाली वापरतो. ही प्रणाली सर्वदूर पारदर्शक आणि डेटा सुरक्षित ठेवते. ४० लाख आकड्यात घोटाळा नाही, तर तो जनगणनेनुसार नियमित भरतीचा भाग आहे. आयोगाने याबाबत सर्व डाटा वेबसाइटवर अपलोड केला असून ‘डुप्लिकेट’ किंवा ‘खोट्या’ मतदारांची यादी तपासणीसाठी खुली असते.
हेही वाचा : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा
मतांच्या चोरीत तथ्य आहे का ?
राहुल यांनी आरोप केला, की कर्नाटकातील महादेवपुरा मतदारसंघात सुमारे एक लाख मते चोरली गेली. परंतु, हा आरोप २०२३ मध्येही काँग्रेसने केला होता, त्यावर निवडणूक आयोगाने तात्काळ चौकशी केली.आयोगाने मतदारांची नावे वगळण्यापूर्वी संबंधित व्यक्तींना नोटीस दिली होती आणि त्यांच्या हरकती मागवल्या होत्या. आजही निवडणूक आयोग काँग्रेसकडून शपथपत्र आणि वास्तव आधारित पुरावे मागत आहे. आयोगाकडे पुरावे न देता सार्वजनिक व्यासपीठावर आरोप करणे ही लोकशाही प्रक्रियेचा गैरवापर आहे. या मध्ये मतदारांचे नाव वगळणे, चुकीचा पत्ता इत्यादी यासारख्या बाबींसाठी मतदार स्वतः फॉर्म भरून दुरुस्त करू शकतो, पण राहुल गांधी यांना केवळ प्रसिद्धीची हाव आहे.
मतांची चोरी, चोरीचे पाच मार्ग..
राहुल यांनी म्हटले आहे, की मतांची चोरी खालील पद्धतीने झाली किंवा करता येते. बनावट मतदार तयार करणे, डुप्लिकेट नावांची नोंद, चुकीच्या पत्त्यांवर आधार घेणे, निवडणूक आयोगाकडून डेटा मिळण्यास अडथळे तसेच सीसीटीव्ही फुटेज नष्ट करणे. एक गोष्ट लक्षात घ्या, यातील अनेक मुद्द्यांवर आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे, ते पाहण्याची इच्छा राहुल गांधी यांची नाही. सीसीटीव्ही फुटेज एक वर्षासाठी सुरक्षित ठेवले जाते आणि निवडणुकीनंतरच ते मिटवले जाते. डुप्लिकेट नोंदी टाळण्यासाठी आयोग आधार लिंकिंग आणि ए आय बेस्ड डुप्लिकेट डिटेक्शन वापरतो. मतदार याद्या आयोगाच्या वेबसाईटवर सार्वजनिकपणे उपलब्ध असतात. मतांची चोरी झालेले कोणतेही स्पष्ट, सर्वमान्य आणि तपासले गेलेले पुरावे काँग्रेसकडे अद्याप नाहीत. त्यामुळे राहुल गांधी यांचा फक्त हवेत गोळीबार सुरू आहे, हे स्पष्ट होते.
निवडणुका ‘कोरिओग्राफ’ झाल्या का ?
‘कोरिओग्राफ’ म्हणजे एखादी गोष्ट ठरवून नियोजित पद्धतीने करणे. राहुल गांधी यांचा हा आरोप अत्यंत गंभीर आहे. पण, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला काही राज्यांमध्ये मोठ्या जागा गमवाव्या लागल्या. जर आयोग पक्षपाती असता, तर हे घडले नसते, हे त्यांच्या लक्षात यायला हवे ! काँग्रेसने पंजाब, तेलंगणा, केरळ, कर्नाटकमध्ये चांगला परफॉर्मन्स केला ही निवडणूक आयोगाची नि:ष्पक्षताच दर्शवते. पराभवाचे खापर आयोगावर फोडणे म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचा नमुना आहे, हे कोणीतरी राहुल गांधी यांना समजावून सांगायला हवे, नाहीतर त्यांची बालबुद्धी भरकटतच राहील !
पराभव स्वीकारा, आरोप कसले करता?
निवडणूक आयोगावर असे पुराव्याविना बिनबुडाचे आरोप करणे म्हणजे संस्थात्मक स्थैर्याला मारक आहे. राजकीय पक्ष पराभव स्वीकारण्याऐवजी आरोप-प्रत्यारोपात गुंतले, तर जनतेचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास ढळू शकतो, हे राहुल गांधी यांना कोण सांगणार ? ते समजून घेण्याची त्यांची क्षमता आहे का ?
कसलेही तथ्य नाही, हवेत गोळीबार..
राहुल यांनी सादर केलेले आरोप हे तथ्यांविना, निष्कर्षांऐवजी आरोपांच्या आधारावर मांडले गेले आहेत. कोणतीही शंका असल्यास तिची चौकशी व्हायला हवीच. पण, त्यासाठी निवडणूक आयोगासोबत सहकार्य करणे हाच लोकशाही मार्ग आहे. प्रेस कॉन्फरन्समध्ये केलेले भाषण आणि सत्य यामधला फरक पाहून जनता हसत आहे.
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया..
या सगळ्या हास्यास्पद प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मते राहुल गांधी यांना त्यांचा मेंदू तपासायला सांगितला पाहिजे. कदाचित, त्यांच्या मेंदूतील ‘चीप’ गायब झाली आहे, म्हणून ते असे बेताल वक्तव्य करत आहेत, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
दिशाहीन काँग्रेस, बेताल नेता..
निवडणूक आयोगावर आरोप करण्यापेक्षा, जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी काँग्रेसने आपले संघटन, विचारसरणी मजबूत करावी. नुसते आरोप करून जनता मतदान करत नसते, त्यासाठी भव्य दिव्य काम करावे लागते आणि देशाची प्रतिमा उंचावत ठेवावी लागते.. त्यामुळेच मतदारांचे मन ‘हॅक’ करता येते, हे राहुल गांधी यांना कोणीतरी सांगा हो !




