प्रियदर्शनी स्कूलची “Centre for Excellence in Early Years” म्हणून निवड!
शिक्षण विश्व: राष्ट्रीय स्तरावर मान्यता, शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

पिंपरी | शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण गुणवत्ता, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि लहान मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या प्रियदर्शनी स्कूल, आलंदी यांना प्रतिष्ठित “Centre for Excellence in Early Years” म्हणून गौरविण्यात आले आहे. ही निवड Association of Indian Principals (AIP) या राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
या गौरवाबरोबरच शाळेला India Early Childhood Excellence Index 2025 या महत्वाकांक्षी आणि व्यापक राष्ट्रीय उपक्रमात Partner School म्हणून मान्यता मिळाली आहे. हा उपक्रम भारतभरातील पूर्व-प्राथमिक शिक्षणामध्ये गुणवत्ता, नावीन्य आणि एकसंध शैक्षणिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी राबवला जात आहे.
हेही वाचा : पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढणार, पण नेमकं कारण काय?

प्रियदर्शनी स्कूलच्या पूर्व-प्राथमिक शिक्षण पद्धती, शिक्षकांचे समर्पण, तसेच शाळेचे दूरदृष्टीपूर्ण आणि बालक-केंद्री धोरण यांची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सीमा फाटक यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले, “हे यश संपूर्ण शाळा परिवाराच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. आमचा उद्देश केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरता मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासाकडेही आमचा विशेष भर असतो.”
प्रियदर्शनी स्कूलची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख…
शाळेतील शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी यांनी या यशाचे स्वागत करत मुख्याध्यापिका आणि व्यवस्थापन मंडळाचे अभिनंदन केले आहे. प्रियदर्शनी स्कूलने गेल्या काही वर्षांत आधुनिक अध्यापन तंत्र, शिक्षकांचे सतत प्रशिक्षण, आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रम यांद्वारे शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. विशेषतः ३ ते ६ वयोगटातील मुलांच्या शिक्षणात त्यांनी केलेल्या सुधारणात्मक आणि प्रयोगशील उपक्रमांना शैक्षणिक तज्ज्ञांकडूनही दाद मिळाली आहे. या निवडीमुळे प्रियदर्शनी स्कूलचे नाव आता राष्ट्रीय स्तरावर घेतले जात असून, अन्य शाळांसाठीही ते एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.





