‘केसरी’चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे निधन

पुणे | लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू आणि ऐतिहासिक ‘केसरी’ वृत्तपत्राचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे बुधवारी (१६ जुलै) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. आज दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ समशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. टिळक यांनी दीर्घकाळ पत्रकारिता, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले होते. ‘केसरी’ या टिळककाळीन वृत्तपत्राचे ते निष्ठावान वारसदार होते. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू विचारवंत, प्रभावी संपादक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.
हेही वाचा : अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच!
त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. रोहित टिळक, मुलगी डॉ. गीताली टिळक, नातवंडे आणि कुटुंबीय असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पुणे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.





