पिंपरी-चिंचवड | प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध
हल्लेखोरांवर मोक्कांतर्गत कारवाईची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

पिंपरी | शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर कार्यरत असलेल्या संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील मराठा व बहुजन समाजासाठी लढणारे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मराठा सेवा संघ, छावा संघटना, मराठा क्रांती मोर्चा आणि इतर पुरोगामी संघटनांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. विशेषतः हल्लेखोर भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी दीपक काटेवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली.
युवक शहराध्यक्ष इमरान शेख म्हणाले, “प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हा हल्ला केवळ एखाद्या व्यक्तीवर नाही, तर महाराष्ट्रातील संपूर्ण पुरोगामी विचारसरणीवर झालेला आहे. भाजपा संघटनेतील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना पाठीशी घालून असे हल्ले घडवले जात आहेत. हल्लेखोर दीपक काटेवर आधीपासूनच अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. भाजपा प्रत्येक जिल्ह्यात एक नवीन वाल्मीक कराड घडवण्याचा प्रयत्न करते आहे का, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.”

हेही वाचा : भक्तिमय वातावरणात ‘ज्ञानवर्धिनी’मध्ये गुरुपौर्णिमा साजरी!
या आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक मारुती भापकर यांनी हल्ल्याला पूर्वनियोजित कट कारस्थान म्हटले. “राज्य सरकारच्या उच्च पातळीवरूनच अशा पुरोगामी नेतृत्वावर हल्ल्यांचे षड्यंत्र रचले जात आहे का?” असा थेट सवाल त्यांनी केला. दीपक काटेवर जन सुरक्षा कायद्यांतर्गत तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
छावा संघटनेचे धनाजी येळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे देवेंद्र तायडे, अरुण पवार, मराठा सेवा संघाचे जाधव सर, प्रियंका ताई बारसे, काँग्रेसचे नरेंद्र बनसोडे आदी मान्यवरांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व वक्त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ व्यक्तीगत नसून विचारवंतांच्या विरोधातील कट असल्याचे स्पष्ट केले.
या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेविका प्रियांका बारसे, देवेंद्र तायडे, धनाजी येळकर, सतीश काळे, सचिन निंबाळकर, नकुल भोईर, नरेंद्र बनसोडे, विशाल जाधव, साकी गायकवाड, ओम शिरसागर, प्रशांत जाधव, दानिश अन्सारी, गणेश देवराम, विकास कांबळे, अक्षय अरोडे, समाधान अचलखांब, तनवीर अहमद, समीर सय्यद यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी सरकारला इशारा दिला की, जर हल्लेखोरांवर कठोर कारवाई झाली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.




