ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

सन्मान छत्रपती शिवरायांचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा !

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारा किल्ल्यांचा ‘युनेस्को’ च्या ‘जागतिक वारसा’ यादीत झालेला समावेश म्हणजे आपल्या देदीप्यमान इतिहासाची, अभिमानाची, स्वाभिमानाची आणि शौर्याची जागतिक स्तरावर उमटलेली मोहरच म्हणावी लागेल. अभेद्य आणि अजोड असे हे १२ किल्ले छत्रपती शिवरायांच्या मुत्सद्दीपणाचे, दूरदृष्टीचे आणि युद्धकौशल्याचे ऐतिहासिक साक्षीदार आहेत. जागतिक पातळीवर त्यांचा गौरव होणे, हा सुवर्णक्षण भारतीयांना अनुभवायला मिळणे, हे खरोखरच रोमांचकारी आहे. सर्व शिवभक्तांचे हृदय अभिमानाने उत्साहाने आणि आनंदाने उचंबळून आले असून फक्त मराठी माणूसच नव्हे, किंवा महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशासाठी हा गौरवशाली क्षण आहे, तो आपण अनुभवत आहोत !

ऐतिहासिक घोषणा आणि गौरव..

छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले जागतिक पटलावर आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि हा गौरवाचा क्षण प्रत्येक शिवप्रेमीने अचूक टिपला. आता, याठिकाणी जागतिक वारसा स्थळ दर्जामुळे जगभरातून पर्यटक येणार असून अफाट प्रसिद्धी तर मिळणार आहेत पण त्याचबरोबर भारताच्या आर्थिक भरारीला मोठी चालना देखील मिळणार आहे. ‘युनेस्को’ ने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याच्या निर्णयावर तमाम शिवप्रेमींनी आणि देशप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. ‘युनेस्को’ च्या या निर्णयामुळे शिवरायांचे १२ किल्ले जागतिक पटलावर आले आहेत शिवरायांची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचणार आहे.

पर्यटनाला मोठी चालना..

‘युनेस्को’ ने छत्रपती शिवरायांच्या अफाट कर्तृत्वाची दखल घेऊन घेतलेल्या या निर्णयामुमळे पर्यटनाला चालना तर मिळेलच, पण, सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहासही वैश्विक पातळीवर नेण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे. आज महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनामनात आदराचे स्थान मिळवलेल्या शिवरायांचा गौरव जागतिक स्तरावर होणार ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे !

नेमके काय घडले ?

छत्रपतींच्या गडकिल्ल्यांचा गौरव होण्यापूर्वी नेमके काय घडले याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. ही घोषणा करताना फडणवीस म्हणावे की सर्वप्रथम जगभरातील शिवप्रेमींचे मी अभिनंदन करतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले हे जागतिक वारसा स्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित करण्यासाठी नॉमिनेट केले होते. मोदींकडे देशभरातील सात वेगवेगळ्या साईट्स गेल्या होत्या. या साईट्सना जागतिक वारसा स्थळ घोषित करण्याची शिफारस केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने पंतप्रधानांकडे केली होती. पण मोदींनी शिवरायांच्या बारा गडकिल्ल्यांना प्राधान्य दिले.

हेही वाचा – राऊत-विरुद्ध शिरसाट वाद आता कोर्टात; शिरसाटांनी राऊतांविरोधात ठोकला अब्रू नुकसानीचा दावा

बारा गडकिल्ले कोणते ?

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली, ती म्हणजे छत्रपती शिवरायांचे ते बारा गड किल्ले कोणते ? यामध्ये महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश आहे, हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे महाराष्ट्रातील तर तामिळनाडूतील जिंजी अशा या बारा किल्ल्यांना आता जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. या किल्ल्यांचे वेस्टर्न घाट, समुद्र, जंगल आदी नैसर्गिक विविधतेत कसे स्थापत्य तयार करण्यात आले. त्याच्या जागा कशा शोधण्यात आल्या, कशा प्रकारे दरवाजे तयार करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी माची कशा तयार करण्यात आल्या. अशा सर्वच गोष्टी भारताने ‘युनेस्को’ पुढे ठेवल्या. त्यानंतर ‘युनेस्को’ च्या शिष्टमंडळाने भारतात येऊन सर्वच किल्ल्यांना भेट दिली. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आपले एक शिष्टमंडळ ‘युनेस्को’त पाठवले गेले. त्यांनी तिथे टेक्निकल प्रेझेंटेशन दिले. त्यानंतर मतदानाचा अधिकार असणाऱ्या सर्वच देशांच्या राजदूतांशी चर्चा झाली आणि त्यानंतर हा ऐतिहासिक निर्णय ऐकण्याचे भाग्य आपल्याला मिळाले.

महाराष्ट्र पातळीवरही हालचाली..

याबाबतीत पाठपुराव्यासारख्या अनेक हालचाली महाराष्ट्रातही कराव्या लागल्या. फडणवीस यांनी म्हटले आहे, की मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात पंतप्रधानांची भेट घेतली. त्यांना मतदानाचा अधिकार असणाऱ्या देशांना विश्वासात घेण्याची विनंती केली. त्यानंतर, त्या त्या देशातील राजदूतांना त्यांच्या देशातील सरकारांशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर वीसही देशांनी आपल्या बाजूने मतदान केले आणि शिवरायांचे बारा किल्ले ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून घोषित झाले. त्यामुळे शिवप्रेमींचा हा एक मोठा विजय आहे.. प्रत्येकाच्या अभिमानाचा क्षण आहे!

इतिहास वैश्विक पातळीवर !

सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मतदान करणाऱ्या सर्वच देशांनी छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या या किल्ल्यांचे मनापासून कौतुक केले. हे किल्ले बांधताना किती पुढचा विचार करण्यात आला होता हे पाहून अनेक देश आणि त्यांचे प्रतिनिधी आश्चर्यचकितही झाले. आता हे किल्ले जागतिक वारसा स्थळ झाल्यामुळे आपल्या छत्रपती शिवरायांचे किल्ले ‘वर्ल्ड मॅप’ म्हणजेच जागतिक नकाशावर आले आहेत. आता ‘युनेस्को’ च्या सगळ्या वेबसाईट्सवर या किल्ल्यांची सर्वच ऐतिहासिक माहिती उपलब्ध होईल.

‘वर्ल्ड टुरिझम मॅप’ वरही..

छत्रपती शिवरायांच्या या किल्ल्यांची, त्यांच्या जडणघडणीची, त्यांच्या लढायांची आणि त्यांनी केलेल्या संघर्षाची ‘वर्ल्ड टूरिझम मॅप’ वर नोंद घेतली असून तेथे हे किल्ले दिसणार आहेत. ‘युनेस्को’ च्या माध्यमातूनही त्या किल्ल्यांच्या ठिकाणी ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून सगळी माहिती असणाऱ्या ‘कियॉस्क’ उभे राहणार आहे.

मराठ्यांचा गौरवशाली इतिहास..

या निर्णयामुळे पर्यटनाला चालना तर मिळेलच, पण त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास वैश्विक करण्यासाठी व वैश्विक पर्यटक आकृष्ट करण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे. त्यामुळे भारतीय व मराठी माणसांसाठी हा एक अतिशय महत्त्वाचा क्षण ठरला आहे.

आर्थिक आघाडीवरही ‘बूस्टर’!

या निर्णयामुळे भारताच्या आर्थिक आघाडीलाही ‘बूस्टर’ मिळणार आहे. त्यामुळे या परिसरातील पर्यटन रोजगारी, हॉटेल व्यवसाय, दळणवळण आणि नैसर्गिक सुविधांची उपलब्धता वेग घेणार असून बरेच काही साध्य होणार आहे. छत्रपती शिवरायांची महती देशाला पडली असून आता जागतिक स्तरावरही त्याची दखल घेतली जाणार, ही आमच्यासाठी नक्कीच अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे, हे नक्की !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group