रावेत बंधाऱ्याच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी
दुरवस्था झालेल्या बंधाऱ्यामुळे पाणीपुरवठात अडथळा; उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

पिंपरी चिंचवड : पवना नदीवरील रावेत बंधारा शंभर वर्षांहून अधिक जुना असून, सध्या जीर्णावस्थेत आहे. गाळाने भरलेला बंधारा पाणीपुरवठ्यात अडथळा ठरत असून, दररोज सुमारे पाच कोटी लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे या बंधाऱ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन बंधाऱ्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हेही वाचा – पालखी सोहळ्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा महापालिकेकडून गौरव
राज्यातील सर्व जुने आणि जर्जर पूल व बंधाऱ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. याच अनुषंगाने रावेत बंधाऱ्याचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी आहे. सध्याचा बंधारा गाळाने भरला असून तेथे जेमतेम एक दिवसाचे पाणी शिल्लक राहते. पवना धरणातून सोडलेले पाणी वाहून जाते. हे नुकसान रोखायचे असेल, तर सुसज्ज बंधारा उभारणे अपरिहार्य आहे. रावेतमधील बंधाऱ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तेथे ‘आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन साडेचार मीटर उंचीचा बंधारा बांधण्यात यावा. यामुळे गाळ साचण्याचे प्रमाण कमी होईल, पाणीसाठा वाढेल, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.





