Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील कर्करोग रुग्णालयाचं अखेर ठरलं! ‘एमएसआरडीसी’च्या जागेवरच उभारणी होणार

पुणे : पुण्यात स्वतंत्र कर्करोग रुग्णालयाच्या उभारण्याचा प्रस्ताव आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) ससून सर्वोपचार रुग्णालयाशेजारील जागा यासाठी योग्य आहे. ही जागा कर्करोग रुग्णालयासाठी देण्याची तयारी ‘एमएसआरडीसी’ने दर्शविली आहे. त्यामुळे लवकरात लवकर जागेचा प्रश्न मार्गी लावून कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीला गती दिली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.

ससून सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री मिसाळ यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. बैठकीला आमदार बापू पठारे, हेमंत रासने, ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलताना मिसाळ म्हणाल्या, ‘ससूनचा स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आहे. ‘एमएसआरडीसी’ची ससूनशेजारील जागा यासाठी योग्य आहे. परंतु, ही जागा मधल्या काळात एका विकसकाला भाडेतत्त्वावर दिली गेली. ही जागा कर्करोग रुग्णालयाला मिळावी, असा प्रस्ताव ‘एमएसआरडीसी’ला पाठविण्यात आला. यावर त्यांनी जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे ही जागा लवकरच ताब्यात मिळून कर्करोग रुग्णालय उभारणी सुरू होण्याची अपेक्षित आहे.’

हेही वाचा –  भीमाशंकरच्या २८८ कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता

ससूनमध्ये केवळ पुणे जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्यभरातून रुग्ण उपचारांसाठी येतात. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रुग्णालयावर ताण वाढला आहे. रुग्णालयातील ११ मजली इमारतीत ५२० नवीन रुग्णशय्यांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव आहे. याचबरोबर रिक्त पदांची संख्याही जास्त असून, ती भरण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत. रुग्णालयात एमआरआय, सीटी स्कॅन आणि कॅथलॅब या अत्याधुनिक निदान सुविधांमध्ये वाढ करण्यात येईल, असेही मिसाळ यांनी स्पष्ट केले.

ससून रुग्णालयाच्या आवारातील अस्वच्छतेवर राज्यमंत्री मिसाळ यांनी ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या, की रुग्णालयाच्या आवारासह विद्यार्थी वसतिगृहांमध्ये पुरेशी स्वच्छता नाही. अपुरे मनुष्यबळ असून, असलेले मनुष्यबळही पूर्ण क्षमतेने कामावर येत नसल्याची रुग्णालय प्रशासनाची तक्रार आहे. अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या सोडविण्यात येणार आहे. स्वच्छतेच्या बाबतीत रुग्णालय प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी.

ससून रुग्णालयाचे प्रस्ताव

स्वतंत्र कर्करोग रुग्णालय

खर्च – ८६० कोटी रुपये

सुपर स्पेशालिटी रुग्णायल

खर्च – ६३३ कोटी रुपये

एमआरआय सुविधा – २७ कोटी रुपये

सीटी स्कॅन सुविधा – ७.५ कोटी

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button