… तर शिंगावर घेण्याची राष्ट्रवादीची तयारी : संदीप पवार
आमदार लांडगे यांना इशारा : भाजपा- राष्ट्रवादीत कलगीतुरा

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या विकासामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोलाचा वाटा आहे. आदरणीय शरद पवार यांनी शहरामध्ये उद्योगांचा पाया रचला आणि अजित पवार यांनी शहराला ‘बेस्ट सिटी’ बनवले, ही खरी वस्तुस्थिती आहे. निवडणुकीच्या राजकारणात कोणी श्रेयवादाचे राजकारण करत असेल आणि कोणी अंगावर घेण्याची भाषा करीत असेल, तर त्याला शिंगावर घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेचे कार्यकर्ते समर्थ आहेत, असा इशारा युवा नेते संदीप पवार यांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवडमधील विकासकामाच्या श्रेयावरून भाजपा-राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगला आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा – विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट,सीबीएसई दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार, नव्या नियमांना मंजुरी
संदीप पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकत निश्चितपणाने पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक आहे. आगामी महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीकडून महायुतीमध्ये असतानाही विकासाच्या श्रेयवादाचे राजकारण केले जात आहे. मुंबई आणि नागपुरची गुलामी करणाऱ्यांनी बारामतीकरांच्या नादाला लागू नये.
अजितदादा पिंपरी-चिंचवडचे भाग्यविधाते…!
अजित पवार यांनी 1997 ते 2017 पर्यंत शहरात अनेक महापौर, उपमहापौर, सभागृह नेता आणि स्थायी समिती सभापती बनवले. दादांनी ताकद दिली नसती तर, ही मंडळी मोठी झाली नसती. अजित पवार राज्याचे नेते आहेत. पिंपरी- चिंचवडचे भाग्यविधाते आहेत. आशिया खंडातील श्रीमंत महापालिका 2017 पासून आतापर्यंत 650 कोटी रुपयांची कर्जबाजारी झाली, याचे उत्तर भाजपाच्या पैलवानांनी द्यावे, असा सवालही संदीप पवार यांनी केला आहे.





