‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रमातून जनजागृती
वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून वाहतूक नियमन, रस्ता सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना माहिती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम राबवण्यात येतो. त्याअंतर्गत वाहतूक शाखेच्या एकूण १५ जणांच्या माध्यमातून १५ शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना रस्ते वाहतुकीबाबत जनजागृती केली जाते.
विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षा, वाहतूक नियमन, अपघातविषयी माहिती, व्यसनाधिनतेपासून दूर राहणे, सायबर गुन्हेगारी, सोशल मीडियाचा वापर आदी मुद्यांवर मार्गदर्शन करण्यात येते. त्यानुसार, गुरुवारी (दि.१९) वाहतूक शाखेमार्फत सतराव्या टप्प्यात १५ शाळांमधून सुमारे ४ हजार १४५ विद्यार्थ्यांची जनजागृती करण्यात आली. त्यांच्यासमोर सादरीकरण करत त्यांना वाहतुकीचे नियम तसेच रस्ते सुरक्षेबाबत माहिती देण्यात आली.
हेही वाचा – कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपक्रम पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलिस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपआयुक्त बापू बांगर, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अनिल कोळी, सहायक पोलिस आयुक्त सतीश कसबे, तसेच वाहतूक शाखेचे सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या माध्यमातून राबवण्यात आला.





