‘अनिल देशमुखांनी स्वत:च स्वत:वर हल्ला करून घेतला’; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप

Anil Deshmukh | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या कारवर सोमवारी रात्री अज्ञात इसमांनी दगडफेक केली. त्यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर आथा राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आता भाजपाचे नेते परिणय फुके यांनी अनिल देशमुखांवरच गंभीर आरोप केला आहे.
परिणय फुके म्हणाले, की अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. याचे व्हिडिओ आणि फोटो आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. खरं तर मी माझ्या अनेक सभांमधून अशाप्रकारची खोटी घटना घडवून आणली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली होती. आज तेच घडलं आहे. तुम्ही जर या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो बघितले तर १० किलोचा दगड त्यांच्या गाडीत पडलेला दिसतो आहे. पण इतका वजनी दगड कुणी १० फुटाच्या अंतरावरून मारू शकत नाही. दगडफेकीसाठी साधारण कोणत्या प्रकारचे दगड वापरले जातात, हे सर्वांना माहिती आहे.
हेही वाचा – चंद्रकांतदादांना विक्रमी मताधिक्याने निवडून देणार; महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा निर्धार
अनिल देशमुखांच्या गाडीच्या बोनेटवरसुद्धा दगड पडलेला दिसतो आहे, मात्र, त्यावर कुठेही निशान दिसत नाही. गाडीच्या काचांनीही मोठ्या भेगा दिसत आहेत. यासगळ्या गोष्टी संशयास्पद आहे. यासंदर्भातील तपास होणं आवश्यक आहे. ही घटना म्हणजे अनिल देशमुखांनी केलेलं नाटक आहे. ते काटोलच्या जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. मागच्या २५ वर्षांपासून ते आमदार होते. मात्र, त्यांनी कोणतीही विकासकामं केलेली नाही. त्यांनी आता त्यांच्या मुलाला निवडणुकीत उतरवलं आहे. तो जिंकून येऊन शकत नाही, हे लक्षात आल्याने अनिल देशमुख हे सगळं नाटक रचवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप परिणय फुके यांनी केला.





