Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उद्या मतदान..!

पिंपरी : गेल्या महिनाभरांपासून उडालेला प्रचाराचा धुरळा सोमवारी (दि.१८) सायंकाळी ६ वाजता शांत झाला आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीन आणि मावळ अशा चार मतदारसंघांत ५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून उद्या बुधवार (दि.२०) रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर शनिवारी (दि.२३) मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अन्य राज्यस्तरीय पक्ष व अपक्षांनीही मतदारांच्या भेटीगाठीवर भर देत, रॅली काढत प्रचाराची सांगता केली.

पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तीनही मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत आहे. शेजारीच असलेल्या मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध अपक्ष अशी लढत होत आहे.

हेही वाचा     –      लातूरमधील एकाधिकारशाही, दहशतीविरुद्ध लढा; डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांचा हल्लाबोल!

चिंचवड विधानसभा मतदारसंघ

महायुतीतील भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांनी शेवटच्या दिवशी मतदारसंघात शक्तिप्रदर्शन करत सांगवी ते किवळे अशी दुचाकी रॅली काढत प्रचाराची सांगता केली. महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी पदयात्रा काढत प्रचाराची सांगता केली. तर अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार मारुती भापकर यांनी पदयात्रा काढत प्रचाराचा समारोप केला.

पिंपरी विधानसभा मतदारसंघ

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत यांनी पदयात्रा काढत मतदारांशी संवाद साधत प्रचाराचा शेवट केला. अजित पवार गटाचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनीही रॅली व संवाद दौरा काढत प्रचाराची सांगता केली.

भोसरी विधानसभा मतदारसंघ

महायुतीतील भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांनी प्रचार दौरा काढत मतदारसंघातील उद्योजक तसेच कामगारांशी संवाद साधत प्रचाराची सांगता केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी मतदारसंघात पदयात्रा काढत प्रचाराची सांगता केली.

मावळ विधानसभा मतदारसंघ

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळके यांनी नाणे मावळ, कामशेत या परिसरात जनसंवाद दौरा काढत प्रचाराची सांगता केली. अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी दुचाकी रॅली काढत प्रचाराचा समारोप केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button