ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांची अमित ठाकरेंसाठी खास पोस्ट; म्हणाले..

Sanjay Mone | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्षांच्या प्रचारसभा सुरू आहेत. अनेक कलाकारही उमेदवारांच्या प्रचारासाठी राजकीय आखाड्यात उतरले आहेत. यातच, ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांनी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासाठी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सनेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून त्यांना आपलं मत का द्यावं याचे १० मुद्दे संजय मोने यांनी फेसबूक पोस्टमध्ये मांडले आहेत.
संजय मोने पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाले?
माझी सर्व कलाकारांना विनंती आहे, तुमचे विचार समाज ऐकतो,तुमची वाह वाह करतो.याचा अर्थ असा नाही कि तुम्ही म्हणाल ते सगळे लोक ऐकतील. आपल्या कलाकारांना समाज फक्त आणि फक्त एक मनोरंजन करणारी व्यक्ती म्हणून ओळखतो. तुम्ही गंभीर भूमिका करा किंवा विनोदी भूमिका करा तुम्ही फक्त काही क्षणांचं,त्यांचं वेळ घालवायचं एक खेळणं असता. कधीही तुमच्या खांद्यावर हात टाकून एक सेल्फी घेण्याइतकीच तुमची किंमत असते. तेंव्हा या निवडणुकीसाठी उगाच प्रचार करून आपण परिस्थिती बदलू शकतो या भ्रमात राहू नका. आपला आत्म सन्मान विकू नका.कारण निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला कोणीहि हिंग लावून विचारणार नाही.(हिंग लावून विचारणं हि एक म्हण झाली. प्रत्यक्षात हिंग महाग असतो)तेंव्हा या वेळी पक्ष नाही तर व्यक्तीला मतदान करा.
आता माझ्या माहीम मतदार संघाबद्दल. इथे बरेच उमेदवार आहेत.त्यातले बरेच विविध पक्षांची सफर करून आले आहेत. त्यांना स्वतःला तरी त्यांचा मूळ पक्ष आठवत असेल का?निशाणी म्हणजे पक्ष नाही.
माझ्या मतदार संघात श्री.अमित ठाकरे उमेदवार आहेत. त्यांना मत का द्यायचं?याची कारणं मला सांगावीशी वाटतात.
१)ते आधीपासून त्याच पक्षाशी निगडीत आहेत.
२)त्यांचा या मतदार संघाशी जन्मापासून संबंध आहे.
३)तरुण आहेत त्यामुळे नव्या पिढीचे जे काही प्रश्न आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत त्याबद्दल त्यांना चांगली माहिती आहे.
४) निवडून आल्यानंतर काही काम करण्याची वेळ येईल तेंव्हा समोर आलेला प्रश्न मराठी,हिंदी (ही लादली गेलेली भाषा आहे )किंवा इंग्रजी (ही आल्या तथाकथित मराठी समाजाने लादून घेतलेली भाषा आहे)या तीनही भाषेत आला तर त्याचा निदान अर्थ समजण्या इतकी त्यांची कुवत आहे.
५)त्यांच्या मतदार संघातले प्रश्न त्यांच्या वडिलांमुळे (मा.श्री.स्वरराज ठाकरे)त्यांना पूर्ण अवगत आहेत
६)आता निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे राहिल्याच्या आधी कुठेही त्यांच्या बद्दल सर्व सामान्य जनतेत भीती धाक दपटशा अशी भावना नाही.
७)वेगात वाहन चालवून अपघात केल्याची एकही नोंद नाही.
८)एका कलाकार म्हणून मला सांगावेसे वाटते कि त्यांच्या पक्षाने कायम मला मानाचीच वागणूक दिली आहे.
९)त्यांच्या घराच्या आसपास असलेल्या सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन प्रश्न ते त्यांच्या पक्षाच्या मदतीने सोडवत आले आहेत.
१०) शिवाजी पार्क ला जर तुम्ही दिवाळीच्या सुमारास गेला असाल तर त्यांच्या पक्षाने एक जागा निश्चित केली होती तिथे या वर्षी काही
हजार तरुण तरुणी येऊन दिवाळी एकत्रपणे साजरी करत होते आणि पार अकरा बारा वाजे पर्यंत निर्धास्त पणे वावरत होते.
आता श्री.अमित ठाकरे यांना मत का देऊ नये याबद्दल खूप विचार करून मुद्दा सुचेना पण तरीही शोधला
१) श्री.अमित ठाकरे अनुभवी नाहीत. पण तो आपणच त्यांना निवडून दिलं तर सहज मिळू शकेल, असं अभिनेते संजय मोने यांनी म्हटलं आहे.





