भाजपाला मोठा धक्का! हिना गावितांचा पक्षाला रामराम

Heena Gavit | माजी खासदार हिना गावित यांनी भारतीय जनता पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभेच्या नंदुरबार मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर हिना गावित यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यांनी अक्कलकुवा मतदारसंघातून विधानसभेचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. यानंतर त्यांनी भाजपाला रामराम केला आहे.
हिना गावित यांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मी नंदुरबारमधून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहे. चार महिन्यांपूर्वी जी लोकसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीत पक्षाने पुन्हा एकदा मला उमेदवारी दिली होती. मी येथून लोकसभेची निवडणूक लढवत होते. परंतु, माझ्या मतदारसंघातील शिवसेनेच्या (शिंदे) पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी त्या निवडणुकीत जाहीरपणे काँग्रेसचा प्रचार केला. त्यानंतर येथून काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी विजयी झाले. ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे. असं असूनही त्यांनी शिवसेनेच्या (शिंदे) नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना थांबवलं नाही. आता अक्कलकुवा मतदारसंघातून शिवसेनेच्या (शिंदे) नेत्याला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे येथील सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे की आम्ही शिवसेनेचा (शिंदे) प्रचार करणार नाही. सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मी येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि मी इथून निवडणूक लढवत आहे. या सर्व बाबी मी माझ्या पक्ष सदस्यत्वाच्या राजीनाम्यात नमूद केल्या आहेत, असं हिना गावित म्हणाल्या.





