मिशन विधानसभा: पिंपरीत महायुतीच्या ‘घड्याळाची टिक-टिक’
मतदार म्हणतात : गोरगरिबांचा विचार म्हणून आमदार बनसोडे यांना साथ

पिंपरी : पिंपरी राखीव मतदारसंघातील मतदार विद्यमान आमदार आण्णा बनसोडे यांच्या सोबत आहेत,असे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विकासाभिमूख आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करणाऱ्या बनसोडे यांना तिकीट दिले. त्यामुळे मतदार संघातील नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. विशेष म्हणजे, भ्रष्टाचार करणाऱ्यांना बाजुला ठेवले, याचे समाधानही व्यक्त केले जात आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुलक्षण शिलवंत-धर यांचा मोठा जनसंपर्क नाही. त्यामुळे या निवडणुकीत बनसोडे यांचे पारडे जड राहील, असा दावा केला जात आहे. तसेच, आकुर्डी – निगडी प्राधिकरणातील उच्चभ्रू मतदारांचा भाजपा महायुतीचा उमेदवार म्हणून बनसोडे यांच्याकडे कल आहे. किंबहुना, पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील महायुती सरकारच्या कल्याणकारी योजनांचा फायदा बनसोडे यांना होईल, असे बोलले जाते.
चिंचवड मतदारसंघात भाजपचे शंकर जगताप यांच्या विरोधात आजवर तीन वेळा निवडणूक लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यासह सर्वात जेष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या सारखा समर्थ पर्याय समोर आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार
भोसरी मतदारसंघातही भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचेच अजित गव्हाणे यांचे तगडे आव्हान असल्याने योग्य पर्याय मतदारांना मिळाला. पिंपरी राखीव मतदारसंघात तशी परिस्थिती नाही.अजित पवार यांचे खंदे समर्थक अशी एकमेव ओळख असलेले आमदार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार तुल्यबळ नाही.
विकासकामांची हातोटी असलेले आमदार बनसोडे हे मतदारांसाठी कायम उपलब्ध असतात. चिंचवड आणि भोसरीचे आमदारांसोबत पिंपरीचे आमदारही विकासकामांसाठी आग्रही असतात. विशेष म्हणजे, मतदार संघातील गोरगरिबांचा परिसरत झोपडपट्टीच्या मतदारांसाठी बनसोडे अक्षरश: मसिहा बनले आहेत.
प्राधिकरण फ्री होल्डच्या निर्णयाचा फायदा…
प्राधिकरण हद्दीतील प्रॉपर्टी फ्री होल्ड करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. पिंपरी मतदार संघात प्राधिकरणवासीयांची संख्या निर्णायक आहे. त्यामुळे फ्री होल्डच्या निर्णयामुळे महायुती सरकारबाबत प्राधिकरणवासीयांमध्ये सकारात्मक वातावरण आहे. त्याचा फायदा आमदार आण्णा बनसोडे यांना होणार आहे.
अजित पवारांची निष्ठावांताला साथ, संधीसाधुंना दूर ठेवले…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निष्ठावंत सहकाऱ्याला साथ दिली. त्यामुळे आण्णा बनसोडे यांचे तिकीट सुरूवातीपासून फायनल होते. मात्र, पक्षश्रेष्ठींकडे व्यापारी-उद्योजक- ठेकेदार यांच्याकरवी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही इच्छुक उमेदवारांनी केला. मात्र, महानगरपालिकेतील बडे अधिकाऱ्यांनी थेट अजित पवार यांच्याकडे संबंधितांना उमेदवारी नको, अशी विनंती केली. किंबहुना, महानगरपालिकेतील सत्ताकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. त्यातून जमवलेली माया निवडणुकीत उधळण्याची तयारी आहे. घरोघरी मतदारांना प्रलोभन दिले जात आहे. त्यामुळेच अजित पवार यांनी दबाव असतानासुद्धा संबंधित इच्छुकांना बाजूला ठेवले. याबाबत इच्छुकांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे, असा पिंपरीतील नागरिकांचा सूर आहे.





