दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी कॅबिनेट मंत्री आतिशी मार्लेनाच्या नावाची घोषणा
संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूची फाशी रद्द व्हावी, आतिशी पालकांचा लढा
दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी आम आदमी पक्षाने कॅबिनेट मंत्री आतिशी मार्लेना यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर ‘आप’च्या माजी नेत्या आणि राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांनी त्यांच्यावर टीकास्र सोडले आहे. आतिशी यांच्या पालकांनी संसदेवर अतिरेकी हल्ला करणाऱ्या अफझल गुरूची फाशी रद्द करण्यात यावी, यासाठी लढा दिला होता, असा आरोप स्वाती मालिवाल यांनी केला आहे. “दिल्लीसाठी आज मोठा दुःखद दिवस आहे. ज्यांच्या कुटुंबियांनी अफझल गुरूला फाशी देऊ नये यासाठी मोठा लढा दिला, त्याच कुटुंबातील एका महिलेला दिल्लीचे मुख्यमंत्री पद देण्यात येत आहे”, अशी पोस्ट मालिवाल यांनी एक्सवर टाकली आहे.
स्वाती मालिवाल यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले, “आतिशी यांच्या आई-वडिलांनी अफझल गुरूला जीवनदान मिळावे यासाठी माननीय राष्ट्रपतींना दयेचा अर्ज पाठविला होता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अफझल गुरू निर्दोष होता. तसेच राजकीय षडयंत्रापोटी अफझल गुरूला अडकविण्यात आले आहे, असाही त्यांचा दावा होता.”
“आतिशी मार्लेन या फक्त नावापुरत्या मुख्यमंत्री राहणार आहेत. तरीही हा मुद्दा देशाच्या सुरक्षेशी जोडला गेलेला आहे. आता देवच दिल्लीचे रक्षण करो”, अशीही टीका मालिवाल यांनी आपल्या पोस्टमधून केली आहे.





