breaking-newsमनोरंजन

प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच २२ वर्षानंतरही सही रे सही नाटकाची यशस्वी घौडदौड; भरत जाधव

पिंपरी | एकच कलाकार एकच नाटक सलगपणे २२ वर्षे करतो आहे आणि या संपूर्ण कालावधीत या नाटकाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळते आहे, हे भाग्य मला मिळाले आहे, अशी भावना प्रसिध्द अभिनेते भरत जाधव यांनी चिंचवड येथे बोलताना व्यक्त केली. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच पाच हजार प्रयोगसंख्येच्या दिशेने पुन्हा सही रे सही या नाटकाची विक्रमी घौडदौड सुरू आहे, असेही ते म्हणाले.

दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने पुन्हा सही रे सही या नाटकाला २२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नाटकातील प्रमुख कलावंत भरत जाधव व इतर कलाकारांचा चिंचवड नाट्यगृहात सत्कार करण्यात आला, तेव्हा ते बोलत होते. दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, उपाध्यक्ष संतोष बाबर, अभिनेते जयराज नायर, मनोज टाकणे, प्रशांत विचारे, निखील चव्हाण यांच्यासह डॉ. विद्याधर कुंभार, डॉ. सुशील अरोरा, नाट्यगृहाचे व्यवस्थापक प्रमोद सावरकर आदी उपस्थित होते. संस्थेचे माजी अध्यक्ष गोरख भालेकर, जगन्नाथ (नाना) शिवले, सचीन साठे यांच्या हस्ते कलावंतांचे सत्कार झाले.

हेही वाचा   –      ‘मागल्या जन्मी पाप करणारा या जन्मी साखर कारखाना काढतो किंवा..’; नितीन गडकरींचं विधान चर्चेत

सत्काराला उत्तर देताना भरत जाधव म्हणाले की, ऑगस्ट २००२ मध्ये मुंबईत या नाटकाचा पहिला प्रयोग झाला, तेव्हापासून आतापर्यंत प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद नाटकाला मिळाला आहे. त्यामुळेच सलग २२ वर्षे या नाटकाची यशस्वी आणि विक्रमी वाटचाल सुरू आहे. नाटकात आम्ही सातत्य ठेवले. प्रयोग सुरूच ठेवले. आता हे नाटक आमचे राहिले नाही, ते पूर्णपणे रसिक प्रेक्षकांचे झाले आहे. त्यांनीच नाटक चालवलेले आहे. मुंबईत नुकतेच राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या नाटकाचा ४४४४ वा प्रयोग पार पडला, तेव्हा आम्ही कलावंतांनीच प्रेक्षकांचे आभार मानले. इतकी वर्षे प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

भरत जाधव पुढे म्हणाले, २००७ मध्ये गलगले निघाले या चित्रपटाच्या शूटींगच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरात आलो होतो, तेव्हा शूटींगसाठी दिशा फाऊंडेशनच्या संपूर्ण टीमने भरपूर मदत केली, ती आम्ही कधीही विसरू शकत नाही. तेव्हापासून या संस्थेशी असलेला स्नेह इतक्या वर्षानंतरही टिकून आहे. दिशाकडून होणारा सत्कार हा आम्हा सर्वांसाठी भावनिक क्षण असून आम्हा कलाकारांना प्रोत्साहन देणारा आहे. दिशाने गेली अनेक वर्षे सातत्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत, त्यात माझाही वेळोवेळी सहभाग राहिला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक जगन्नाथ (नाना) शिवले यांनी केले. संतोष निंबाळकर यांनी स्वागत केले. नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button