breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणसंपादकीय

To The Point : शिरुर लोकसभेतून शिवसेनेची ‘मशाल’ मैदानाबाहेर!; ‘तुतारी’कडे इच्छुकांचा ओढा!

खासदार डॉ. अमोल कोल्हेंमुळे लोकसभेला काम करुनही शिवसेना ‘गारद’ : सहाही मतदार संघांमध्ये ‘तुतारी’कडे तगडे उमेदवार!

पुणे । विशेष प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. आमोल कोल्हे यांनी शिरुर लोकसभा मतदार संघात ‘मिशन तुतारी’ सुरू केले आहे. मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघात पक्षाकडे तगडे उमेदवार असल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्हावर उमेदवारीसाठी झगडावे लागणार आहे.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 2004, 2009 आणि 2014 असे सलग तीनवेळा शिरुर लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेनेचे (धनुष्यबाण) वर्चस्व राखले होते. मात्र, 2019 मध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी या वर्चस्वाला सुरूंग लावला. राष्ट्रवादीच्या तिकीटावर त्यांनी मतदार संघ खेचून आणला. त्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी दोन्ही पक्षांमध्ये मोठी फूट पडली. तरीही डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसैनिकांच्या जोरावर विजयाची ‘तुतारी’ वाजवली.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत शिरुरमधून दोन्ही शिवसेना हद्दपार होण्याची चिन्हे आहेत. कारण, या दोन्ही पक्षांकडे स्थानिक पातळीवर तगडे उमेदवार नाहीत.

खेड विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे अतूल देशमुख, सुधीर मुंगसे असे तगडे उमेदवार आहेत. देशमुख यांना डॉ. कोल्हे यांचा ‘ग्रीन सिग्नल’ आहे. या दोन्ही उमेदवारांच्या तुलनेत शिवसेना ठाकरे गटाकडे तोडीचा उमेदवार नाही.

जुन्नरमध्ये विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी ‘‘पवार साहेब आमचे कुटुंबप्रमुख आहेत’’ असा दावा केला. या ठिकाणी शिंदे गटाचे शरद सोनवणे, भाजपाच्या आशा बुचके रिंगणात आहेत. ‘पॉलिटिकल बॅलन्स’ करीत अतुल बेनके ‘तुतारी’च्या वाटेवर गेले, तर आश्चर्य वाटायला नको. विशेष म्हणजे, जुन्नरमधून डॉ. अमोल कोल्हे यांचे कट्टर समर्थक सत्यशील शेरकर काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणीसुद्धा ‘मशाल’ पेटण्यासाठी संधी नाही.

आंबेगावमध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांना डॉ. अमोल कोल्हे यांनी मध्यंतरी जाहीर कार्यक्रमामध्ये ‘‘भावी आमदार’’ असे घोषित केले होते. त्यामुळे निकम यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. याच कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाच्या सुरेश भोर आणि राजाराम बाणखेले यांनी संताप व्यक्त केला होता. यावरुन ठाकरे गटाची ‘मशाल’ आंबेगावमध्ये पेटणार नाही, ही बाब अधोरेखित होते.

शिरुर- हवेली विधानसभा मतदार संघामध्ये विद्यमान आमदार अशोक पवार शरद पवार गटासोबत आहेत. त्यामुळे ही जागा ‘तुतारी’कडेच राहील यात शंका नाही. किंबहुना ठाकरे गटाला या ठिकाणीसुद्धा सक्षम उमेदवार नाही.

हडपसर विधानसभा मतदारसंघात दोन्ही इच्छुक उमेदवार अनुक्रमे प्रशांत जगताप व प्रमोद भानगिरे हे अनुक्रमे राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) चे शहर अध्यक्ष आहेत. महायुतीत आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षामुळे उमेदवारीसाठी रस्सीखेच होऊ शकते. कारण, विद्यमान आमदार आमदार चेतन तुपे हे अजित पवार गटात आहेत. आता महाविकास आघाडीकडून प्रशांत जगताप यांची उमेदवारी ‘तुतारी’ चिन्हावर निश्चित मानली जात आहे. अलिकडेच ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांची लोकसभा निवडणुकीत ‘डिपॉझिट’ जप्त झाली आहे. त्यांनी राजकीय पुनर्वसन करण्यासाठी ठाकरे गटात प्रवेश केला. पण, विधानसभा उमेदवारीबाबत प्रशांत जगताप यांचे पक्षातील वजन पाहता वसंत मोरे यांच्या रुपाने ‘मशाल’ला उमेदवारीसाठी ‘कात्रजचा घाट’ दाखवण्यात येईल, असे राजकीय जाणकार सांगतात.

लोकसभा निवडणुकीमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयासाठी निष्ठवंत शिवसैनिकांनी जीवाचे रान केले. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या निष्ठावंतांना ‘निवडून येण्याची क्षमता’ या निकषावर बाजुला केले जाते का? अशी खंत शिवसैनिकांकडून बोलून दाखवली जात आहे.

भोसरीत ठाकरे गटाला वाव आहे, पण संधी नाही..!

भोसरी विधानसभा मतदार संघात अजित पवार गटातून शरद पवार गटात दाखल झालेले अजित गव्हाणे यांनी जोरदार तयारी सुरू केली. त्यानंतर माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मात्र, निष्ठावंत शिवसैनिक सुलभा उबाळे आणि धनंजय आल्हाट हेसुद्धा निवडणुकीसाठी इच्छुक असल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरुन संभ्रम आहे. परंतु, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित गव्हाणे यांच्यामागे ताकद उभा केली. काही दिवसांपूर्वी सुलभा उबाळे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या ‘जनसंवाद’ मेळाव्यास डॉ. कोल्हे यांनी दांडी मारली होती. उमेदवारीच्या तीव्र दावेदार असलेल्या सुलभा उबाळे यांचा प्रचारही काही दिवसांपासून थंडावलेला पहायला मिळतो. त्यामुळे ‘तुतारी’ला जागा सोडल्यास आम्ही काम करणार नाही, असे म्हणणाऱ्या सुलभा उबाळे यांनी उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच ‘तडजोडी’ केल्याची चर्चा निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये सुरू झाली आहे. दुसरीकडे, किमान ५० हजार मते एकगट्टा मतदार असलेल्या ठाकरे गटामध्ये इच्छुकांची संख्या जास्त आणि निष्ठावंत असा तिढा निर्माण होणार असल्यामुळे या मतदार संघातही शिवसेना ठाकरे गटाला वाव राहील, असे चित्र नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button