Pune | पीएमपी कर्मचाऱ्यांचा संप, पुणेकरांची मोठ्याप्रमाणात गैरसोय
पुणे | पीएमपी कर्माचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज सोमवारपासून संप सुरू केला आहे. या संपामुळे पीएमपीच्या संचलनातील गाड्या कमी झाल्याने शहरातील हजारो नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. या संपाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे.
पीएमपी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती स्थापन करण्यात आली असून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम विनाविलंब मिळावी, ६ वर्षांपासून सेवेत असणाऱ्या बदली रोजंदारी सेवकांना सेवेत कायम करण्यात यावे, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पदोन्नती द्यावी, अशा काही मागण्या समितीकडून करण्यात आल्या होत्या. या मागण्या मान्य न झाल्यास सोमवारपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी मध्यरात्रीपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्याचा फटका पुणेकरांना बसला आहे.
संपाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त गाड्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न पीएमपी प्रशासनाकडून करण्यात येत असून चर्चेला सुरूवात करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला.