Pimpri Chinchwad | हातात पिस्तुल घेऊन रिल्स बनवणाऱ्यांना बेड्या, पाच जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी | पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सोशल मिडियाद्वारे दहशत निर्माण करणाऱ्या रील भाईंवर लक्ष केंद्रित केले आहे. चिखली परिसरात दुचाकीवरून जाताना पिस्तूल हवेत फिरवून दहशत पसरवणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
कुणाल रमेश साठे (वय २६, रा. मोरेवस्ती, चिखली) आणि त्याचा अल्पवयीन साथीदार या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह यश कांबळे (रा. टॉवर लाईन, चिखली), सुशील गोरे उर्फ बारक्या (रा. ओटास्कीम, निगडी) आणि रोहित मिश्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार आशिष बोटके यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा – ‘..तर आम्ही निर्णय घेणार’; बच्चू कडूंचा महायुती सरकारला इशारा
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर दुचाकीवर हातात पिस्तुल घेऊन ते हवेत उंचावून रिल्स काढत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यापैकी एक आरोपी यश कांबळे हा दुचाकीवर पाठीमागे पिस्तुल हवेत उंचावत आहे. त्याचा व्हिडिओ पाठीमागे असलेल्या दुचाकीवरील तरुणांनी मोबाईलमध्ये काढला आहे. या प्रकरणी तातडीने दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिस्तुल बनावट आहे की खरं याबाबत पोलीस तपास करत आहेत. अद्याप मुख्य आरोपीचा शोध पोलीस घेत असून आरोपी पिस्तूलासह फरार आहे.