बांधकाम एनआेसीची माहिती द्या, अन्यथा तोपर्यंत कार्यालयाबाहेर पडायचे नाही
आयुक्त श्रावण हर्डिकर हे नगरसेवकांचे फोनही उचलत नाहीत
शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी अतिरिक्त सहशहर अभियंता रामदास तांबेना ठेवले थांबवून
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिका पाणी पुरवठा अधिका-यांचा हम करेसो कायदा सुरु झाला आहे. कित्येक दिवसापासून पाणी टंचाईचे कारण पुढे करुन चिंचवड विधानसभा मतदार संघात ना हरकत दाखला देणे बंद केले. परंतू, मागील दोन दिवसापासून पाण्याची परस्थिती बिकट असूनही अचानक बिल्डरांना एनआेसी देणे सुरु केले. त्यामुळे शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी याबाबत आयुक्त श्रावण हर्डिकर, पाणी पुरवठा अतिरिक्त सहशहर अभियंता रामदास तांबे यांना जाब विचारला होता. मात्र, गेंड्याच्या कातडी असलेले अधिकारी बांधकाम एनआेसीची कसलीही माहिती देत नसल्याने आज (शनिवारी) सायंकाळी साडे सहा वाजता तांबे यांच्या कार्यालयात ठिय्या मारुन बांधकाम एनआेसीची माहिती देत नाही, तोपर्यंत कार्यालयाबाहेर पडायचे नाही, असा इशारा देत त्यांना थांबवून ठेवले होते. दरम्यान, यावेळी पालिका आयुक्तही गटनेत्यांचा फोन उचलत नसल्याने दिसून आले.
चिंचवड विधानसभा मतदार संघातील पाणी टंचाई जाणवू लागल्याने पिंपळेगुरव, पिंपळे सौदागर, ताथवडे, रावेत, वाकड, पुनावळे, मामुर्डी, किवळे इत्यादी भागात काहीकाळासाठी गृहप्रकल्प बांधण्यास परवानगी देण्यात येऊ नये, असा ठराव स्थायी समिती सभेत ऐनवेळी घेतला. त्यावेळी स्थायी समितीने त्या भागात नवीन प्रकल्पामुळे नागरिकांनी कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. त्यावर बांधकाम विभागाने पाणी पुरवठ्याचा सध्यस्थिती अहवाल मागितला होता. तो अहवाल आयुक्तांना पाणी पुरवठा विभागाने सादर केला होता. सध्यस्थितीत बांधकाम प्रकल्पांना पाण्याची काहीच अडचण नसल्याचे त्यात म्हटले होते. तरीही बांधकामाना एनआेसी देणे बंद केले होते.
दरम्यान, महापालिका पाणी पुरवठा विभागाने गुरुवारी (दि.4) अचानक दहा बिल्डरांना पाणी पुरवठा एनआेसी दिल्या आहेत. तसेच त्या एनआेसी केवळ एका दिवसात देवून पुन्हा एनआेसी देणे बंद करण्यात येणार होत्या. मात्र, महापालिका आयुक्तांच्या सांगण्यावरुन पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी काही बिल्डरांना हाताशी धरुन एनआेसी दिलेल्या आहेत. पालिका आयुक्तांनी शुक्रवारी (दि.5) याविषयी संबंधित अधिका-यांकडून माहिती घेवून आपणास देवू असे आश्वासन दिले होते. परंतू, आज शनिवारी आयुक्तांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच त्यांनी फोनही उचलण्यास टाळाटाळ करु लागले आहेत. यामुळे अधिकारी हे केव्हाही एनआेसी सुरु अनं बंद असा प्रकार सुरु आहे.