वसईत तरुणीची निर्घृण हत्या, राज्य महिला आयोगाकडून घटनेची गंभीर दखल
मुंबई : मुंबईतील वसईमध्ये भररस्त्यात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने वार करून हत्या केली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून राहिला. त्यानंतर काही वेळात घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. या घटनेमुळे राज्यभरातून संत्पत प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आता या घटनेची राज्य महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वालीव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांशी संवाद साधत आरोपीवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
“वसईमध्ये भरस्त्यात एका तरुणाने मुलीवर वार करत तिची हत्या केली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणामध्ये कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करत पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. राज्य महिला आयोगाच्यावतीने तातडीने पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. वालीव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयराम रणावरे यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधत यामध्ये कलम त्याचबरोबर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत”, असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! सांगोल्यात पाच महिलांना ट्रकने चिरडले
“या सगळ्या घटनेमध्ये पुरावे सादर करत असताना ठोस दोषाआरोप पत्र देखील सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खरंतर अशा घटना घडत असताना मुलांमध्ये हिंसक वृत्ती निर्माण होऊन व हत्येपर्यंत मजल जाणं त्याहूनही बघ्यांमध्ये नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना कोणीही मदतीला न येणे हे फारच चिंताजनक आहे. राज्य महिला आयोगाच्यावतीने आरोपीवर पुढील कडक कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल”, असं आश्वासन रुपाली चाकणकर यांनी दिलं आहे.
नालासोपारा येथे राहणारा रोहित यादव (२९) याचे एका मुलीवर मागील सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र प्रेयसी अन्य मुलांशी बोलत असल्याचा संशय रोहितला होता. यावरून त्या दोघांमध्ये भांडणं होत होती. त्यामुळे रोहित संतप्त झाला होता. रोहितची प्रेयसी वसईच्या एका कंपनीत कामाला लागली होती. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली होती. मात्र गावराई पाडा येथील परिसरात रोहितने तिला अडवले. दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी रोहितने आपल्या सोबत आणलेल्या लोखंडी पान्याने तिच्यावर सपासप वार केले. यामध्ये तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी रोहित तिथेच बसून राहिला. वालीव पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी रोहितला ताब्यात घेतले.