राज्यसभेच्या उमेदवारीवरून छगन भुजबळ नाराज? अजित पवार म्हणाले..

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. याबाबत विचारलं असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ हे नाराज नसून माध्यमांमध्ये खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, छगन भुजबळ नाराज आहेत, हे पूर्णपणे खोटं आहे. ते नाराज नाहीत, असं त्यांनी काल सांगितलं आहे. प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे की कोणीही नाराज नाही. मात्र, विरोधक आणि आमच्या जवळच्या मित्रांनी या बातम्या पेरल्या आहेत. राज्यसभेसाठी एकमेव अर्ज दाखल झाला असून तो अर्जदेखील मंजूर झाला आहे. आता उमेदवाराने (सुनेत्रा पवार) माघार घेतली नाही. तर ते बिनविरोध खासदार होतील.
हेही वाचा – ‘पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा’; उपमुख्यमंत्री अजित पवार
सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरताना महायुतीतील घटक पक्षातील नेते का उपस्थित नव्हते? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, ज्यावेळी दिवशी आम्ही उमेवदारी अर्ज दाखल केला, त्यावेळी देवेंद्र फडणवीस नाशिक मध्ये होते, अमोल काळे यांच्या निधनामुळे ते दु:खी होते. त्यामुळे मी त्यांना कसं बोलणार? अशावेळी त्यांना बोलवणं मला योग्य वाटलं नाही. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्याशीदेखील माझं बोलणं झालं होतं.





