प्रफुल्ल पटेलांना मोठा दिलासा! ईडीने जप्त केलेली १८० कोटींची मालमत्ता परत
![180 crore property seized by ED will be returned to Praful Patel](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Praful-Patel-780x470.jpg)
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांना मुंबईतील अपील न्यायाधिकरणाने मोठा दिलासा दिला आहे. सक्तवसुली संचालनालयाने पटेल यांचे १८० कोटी किंमतीचे मुंबईतील दोन घरं जप्त केले होते. याप्रकरणी मुंबईच्या SAFEMA कोर्टाने ईडीचा निर्णय रद्द केला आहे.
वरळीतील सीजे हाऊस या इमारतीमध्ये प्रफुल पटेल यांच्या मालकीचे चार मजले आहेत. ज्याची किंमत १८० कोटी असून प्रफुल पटेल आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे ही मालमत्ता आहे. प्रफुल पटेल, त्यांच्या पत्नी वर्षा आणि मिलेनियम डेव्हलपर या कंपनीच्या मालकीची घरे या इमारतीमध्ये आहेत.
हेही वाचा – उद्धव ठाकरेंचे दोन खासदार मोदींना पाठिंबा देणार; शिंदे गटातील नेत्याचा दावा
ईडीने असा दावा केला होता की, ही संपत्ती बेकायदेशीरपणे इक्बाल मिरचीची पहिली पत्नी हजरा मेनन हिच्याकडून घेण्यात आली होती. इक्बाल मिरची हा ड्रग माफीया आणि गँगस्टर दाऊद इब्राहिम यांचा उजवा हात आहे. मिरची हा १९९३ मधील मुंबई ब्लास्ट प्रकरणातील दोषी आहे. त्याचा मृत्यू लंडनमध्ये २०१३ मध्ये झालाय.
कोर्टाने ईडीचा आदेश रद्द केला आहे. कोर्टाने स्पष्ट केलंय की, तपास यंत्रणेने प्रफुल्ल पटेल यांच्या संपत्तीविरोधात केलेली कारवाई बेकायदेशीर आहे. कारण, या संपत्तीचा आणि मनी लाँड्रिंगचा काही संबंध नाही. शिवाय ही घरे मिरची याच्याशी संबंधित असल्याचं समोर आलेलं नाही. कोर्टाने पुढे म्हटलं की, १४००० स्क्वेअर फुटाचे मेनन आणि त्याच्या दोन मुलांची सीजे हाऊसमधील संपत्ती स्वतंत्रपणे जप्त केलेली आहे. दोघांना यापूर्वीच फरार म्हणून घोषित केले आहे.