‘एकनाथ खडसे भाजपमध्ये येतील, तेव्हा..’; गिरीश महाजनांचं मोठं विधान

मुंबई | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. खडसेंनी दिल्लीत जाऊन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटल्याचीही चर्चा आहे. यावरून भाजप नेते आणि खडसेंचे कट्टर राजकीय विरोधक गिरीश महाजन यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
गिरीश महाजन म्हणाले की, स्वागतच करणार आहेत ना ! ज्यावेळी येतील तेव्हा ना ! ठरू तर द्या मुहूर्त. हे सर्व जर तरचे प्रश्न आहेत. त्याला काहीही अर्थ नाही. अजूनही त्यासंदर्भात कुठलीही वाच्यता नाही. भाजपप्रवेश करणार, हे सर्व समाजमाध्यमांतून आणि प्रसारमाध्यमांतूनही येत आहे. ते येतील तेव्हा त्यांचे कसे स्वागत करायचे, ते तेव्हाच बघू.
हेही वाचा – ‘नारायण राणे दोन महिन्यांनी तिहार तुरूंगात जातील’; संजय राऊतांचं मोठं विधान
जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर पाच लाखांपेक्षा अधिक मताधिक्क्य मिळणार असून, यात जळगाव मतदारसंघातून एक ते सव्वा लाखाचे मताधिक्क्य असेल. दोन्ही ठिकाणी विजय निश्चित असून, कुणीही काहीही चर्चा केली, तरी जळगाव मतदारसंघातील उमेदवार बदलला जाणार नाही, असं गिरीश महाजन म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांचा मुद्दा वेगळा होता. मलाही ते भेटायला आले होते. मात्र, पण मला उशीर झाला. त्यानंतर आम्ही दोघे जळगावात भेटलो. मी त्यांना सांगितले, आपल्याला निवडणुकीत सोबत काम करावे लागेल. महायुतीचा घटकपक्ष म्हणून आपण सोबत आहोत. आपणही शिंदे गटात आहात. चंद्रकांत पाटील आमच्यासोबत आता आहेत, असे नमूद करीत आपण व आपले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते निवडणुकीत रक्षा खडसेंसोबत राहावे, असे पाटील यांना चर्चेवेळी सांगितले. आता मला वाटते, त्यांनी ते मान्य केले आहे. त्यांनीही मला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम करायचे आहे. मतदान कमळालाच करायचे आहे, अशी ग्वाही दिल्याचे महाजन यांनी सांगितले.





