डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, सांगलीतून उमेदवारी जाहीर
मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. आज मातोश्रीवर चंद्रहार पाटील यांचा पक्षप्रवेश पार पडला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत चंद्रहार पाटील यांनी हातावर शिवबंधन बांधलं आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगलीतून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे.
पक्षप्रवेशानंतर चंद्रहार पाटील म्हणाले, मला आज मनापासून उद्धव ठाकरेंचे आभार मानायचे आहेत. एका शेतकऱ्याचा मुलाला तुम्ही जो सन्मान केलात त्याबद्दल मी आभार मानतो. मी आज जास्त काही बोलणार नाही. पण खात्रीने सांगेन की लोकसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातला आपला पहिला निकाल असेल. एका शेतकऱ्याच्या मुलाला एवढ्या मोठ्या कुटुंबात सहभागी करुन घेतलंत त्यामुळे मी आभार मानतो.
हेही वाचा – वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता
उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या सर्वांचं मातोश्री आणि शिवसेनेत स्वागत करतो आहे. माझी छाती आज अभिमानाने फुलून आली आहे. छाती किती इंच झाली आहे ते काय मी सांगू शकत नाही. या मर्दाची छाती पाहिल्यावर सांगलीत कुणी समोर येणार नाही. पक्षातले नामर्द पळून गेले आहेत. मात्र मर्द शिवसेनेत येत आहेत. मारुती माने माझ्या लहानपणी घरी यायचे ते दिवस आठवले. आज डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला, मी तुमचं स्वागत करतो. लोकांनी सगळं ठरवलं आहे.. की तुम्हाला सांगलीतून उभं करायचं त्यामुळे तुम्हाला वेगळे संकेत काय द्यायचे.
आपल्याला गदा आणि मशाल घेऊन सांगलीतला मर्द दिल्लीत पाठवायचा आहे. सांगलीत बरीच वर्षे मी आलो नाहीये आता मी येणार. गद्दारांनाच आता आडवं करायचं आहे. हुकूमशाही विरुद्ध लढताना मर्द, पैलवान शिवसेनेत आले आहेत. संपूर्ण जनता आपल्याकडे अपेक्षेने पाहते आहे. आता महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास दृढ झाला असेल की आमच्यासाठी लढणारे मर्द आहेत. मी आता विजयाच्या सभेसाठी सांगलीत येणारच. आपल्याला विजय मिळवावाच लागेल. त्या लढाईसाठी मी शुभेच्छा देतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.