जुन्नरमधील आदिवासी बांधवांचे श्रद्धांस्थान कुकडेश्वरचा कळस आता दृष्टिक्षेपात !
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची माहिती : निविदा प्रक्रिया सुरु झाल्याने समाधान
पुणे : जुन्नरमधील आदिवासी बांधवांचे श्रद्धांस्थान कुकडेश्वरचा कळस आता दृष्टिक्षेपात आले आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, जुन्नर तालुक्यातील पूर येथील पुरातन कुकडेश्वर मंदिर हे आदिवासी बांधवांसह असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या प्राचीन मंदिरावर कळस उभारला जावा ही तमाम भाविकांची इच्छा होती, मात्र विघ्नहर सहकारी साखर कारखान्यामार्फत जिर्णोद्धार करताना मंदिरावर कळस बांधण्यासाठी माहिती पुरातत्व विभागाने आराखडा व ड्रॉइंग दिले नव्हते. त्यामुळे कळसाचे काम करता येत नव्हते. कळस असल्याशिवाय मंदिर अपूर्ण आहे अशी भावना असंख्य भाविकांच्या मनात होती.हे मंदिर राज्य संरक्षित असल्याने राज्य पुरातत्त्व विभागाकडून विविध परवानग्या, आराखडा व अंदाजपत्रक या बाबींच्या पूर्ततेची आवश्यकता होती. मायबाप जनतेचा प्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडत असताना मंदिराच्या कळसाचे काम करण्याबाबत मी नागरिकांना शब्द दिला होता.
हेही वाचा – ‘पिंपरी-चिंचवडला झोपडपट्टीमुक्त करण्याचा निर्धार’; उपमुख्यमंत्री अजित पवार
तसेच, पुरातन कुकडेश्वर मंदिरावर कळस व्हावा यासाठी पर्यटन विभागाच्या तत्कालीन राज्यमंत्री आदितीताई तटकरे, पुरातत्व व वस्तू संग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. आपल्या पाठपुराव्याला यश येऊन तज्ज्ञ वास्तुविशारद नेमून कळसाचा आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालकांना देण्यात आले होते. कळसाच्या दिशेने पडलेले हे आपले पहिले पाऊल होते, असेही खासदार डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे.
निर्देशाप्रमाणे पुरातत्व विभागाच्या संचालकांकडून नासाडीया वास्तुविशारद संस्थेच्या अर्चना देशमुख यांची वास्तुविशारद म्हणून नेमणूक करण्यात आली होती. अभ्यासाअंती त्यांनी कुकडेश्वर मंदिराच्या कळसाचा आराखडा व अंदाजपत्रक पुरातत्व विभागाकडे सादर केले आणि मंदिराच्या कळसाचे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्ष साकारणार याची खात्री वाटू लागली. कुकडेश्वर मंदिराच्या कळसाचा आराखडा व अंदाजपत्रक पुरातत्व विभागाकडून मंजूर होऊन आज प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मंदिराच्या छताचे, भिंतींचे, भित्तीचित्रांचे संवर्धन, संरक्षक भिंत बांधणे इत्यादी कामे सुरू होणार असून संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यानंतर ६ महिन्यांच्या निरिक्षणाअंती कळसाचे वजन इत्यादी तांत्रिक बाबी ठरवल्या जाणार आहेत.