‘ईडी म्हटलं की झोपेतही धावणारे..’; भाजपचा शरद पवारांना खोचक टोला
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडमधील सभेत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. पवारांनी ईडीचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावरही खोचक टीका केली. याला आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, रात्री झोपेतही ईडी म्हटलं तर एक किलोमीटर धावणारे हे लोक आहेत. आता त्यांनी आम्हाला तत्वज्ञान सांगायचं? असा खोचक टोला लगावला. ज्यांनी आयुष्यात आपल्या परिवारासाठी काम केलं. ज्यांचं आयुष्य राजकारणात स्वत:च्या परिवारासाठी गेलं, त्यांनी ज्ञान द्यायचं? उलथून टाकायची भाषा त्यांनी करावी ज्यांनी आयुष्यभर जनतेच्या हितासाठी निर्णय घेतले, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
हेही वाचा – कॅगच्या अहवालातून मोदी सरकारच्या ७ पायाभूत प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार समोर
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच १५ ऑगस्टनिमित्ताने लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात भाषण करताना घराणेशाहीवर टीका केली होती. भ्रष्टाचार, घराणेशाही व वितुष्टीकरण या तीन अडचणी पार केल्याशिवाय देशात विकास अशक्य आहे, असं विधान मोदींनी केलं होतं. यावरून शरद पवार यांनी भाष्य केलं होतं.