‘महाराष्ट्र वाचविण्यासाठी राज्याची धुरा आपल्या खांद्यावर घ्या’; युवकाची रक्ताने पत्र लिहत राज ठाकरेंकडे मागणी

मुंबई : सध्या राज्यातील राजकीय घडामोडी खुप वेगाने घडत आहेत. राजकारणाचा स्तर वारंवार खालावला जात आहे. या पार्श्वभूमीवर गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात द्वीतीय वर्षात शिकणाऱ्या युवकाने थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना रक्ताने पत्र लिहलं आहे. यामध्ये त्याने राज ठाकरेंनी राज्याची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी, अशी मागणी केली आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्दितीय वर्षात शिकणाऱ्या विशाल ढेबे या युवकाने आपल्या रक्ताने एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्याने म्हटलं आहे की, सध्या महाराष्ट्रामध्ये अराजकता वाढली असून राजकारणी हे ज्वलंत प्रश्नांकडे कानाडोळा करीत आहेत. स्वतःच्या हितासाठी राजकारण करत आहेत. एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण सुरू केले आहे. समृद्धी महामार्गावर एवढा मोठा अपघात होऊनसुद्धा आपले लोकप्रतिनिधी हे शपथविधी घेतात. महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे प्रश्न असून महिला सुरक्षित नाहीत. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत.
हेही वाचा – मणिपूर मुद्यावरून विरोधी पक्षातील महिला आमदार आक्रमक; विधानसभेतून सभात्याग!
मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत, असे असूनसुद्धा ‘शासन आपल्या दारी’ या योजनेतून योजना सरकार लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करते, पण त्यांचे प्रश्न काय आहेत, हे सोडविण्याचा प्रयत्न करीत नाही. यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपण या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी या महाराष्ट्राची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी आणि महाराष्ट्राला एक वैभव लाभावे अशी भावना व्यक्त केली.





