पुण्यात भाजपाने भाकरी फिरवली! पिंपरी-चिंचवडच्या प्रभारीपदी वर्षा डहाळे!
आगामी निवडणुकांची तयारी; माजी खासदार अमर साबळे पुण्याचे प्रभारी
पुणे : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे शहर प्रभारी म्हणून अमर साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रभारी म्हणून वर्षा डहाळे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी नियुक्ती देण्यात आलेले राजेश पांडे यांना आता पुणे ग्रामीण आणि मावळचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने पुणे जिल्ह्यासाठी भाकरी फिरवण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा कार्यकाळ संपला आहे. तसेच, नव्या मंत्रीमंडळ विस्तारात लांडगे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नवीन चेहऱ्याला संधी देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्यामध्ये माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, शंकर जगताप यांची नावे आघाडीवर आहेत.
हेही वाचा – अजित पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र, केली ‘ही’ मागणी
जिल्हा विभाजनाच्या मागणीला बळ..
तसेच, भाजपाकडून आता नवीन २ विभाग करण्यात येणार आहेत. त्यात उत्तर पुणे जिल्हा आणि दक्षिण पुणे जिल्हा असे विभाग करण्यात येणार आहेत. त्यासाठी २ जिल्हाध्यक्ष देखील निवडले जाणार असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. काही दिवसांपूर्वी, पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी पुणे जिल्ह्याचे विभाजन करुन ‘शिवनेरी’ हा नवीन जिल्हा तयार करावा, अशी मागणी केली होती. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा विभाजनाच्या मागणीचा एकत्रित विचार करावा लागेल, असे सांगितले होते. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्यापद्धतीने संघटनात्मक बदल करताना उत्तर पुणे जिल्हा आणि दक्षिण पुणे जिल्हा असे दोन विभाग करण्याबाबत हालाचाली सुरू आहेत. त्यासाठी वेगवेगळे जिल्हाध्यक्ष करण्यात येणार आहेत. त्यामुळे आमदार लांडगे यांच्या जिल्हा विभाजनाच्या मागणीला बळ मिळाले आहे.