‘संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार’; नितेश राणेंचा मोठा दावा

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत १० जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असा मोठा दावा केला आहे.
नितेश राणे म्हणाले की, संजय राऊतांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतची माहिती मला सूत्रांनी दिली आहे. त्यांनी हे पण सांगितलं की तुम्ही संजय राऊत यांची शरद पवारांच्या राजीनाम्याच्या वेळीची भूमिका नीट पाहा. तसेच त्याआधीची भूमिका देखील पाहा. संजय राऊत हे सातत्याने अजित पवारांवर टीका करच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी संजय राऊत यांची एक अट आहे. ती म्हणजे अजित पवारांनी पक्ष सोडला तर मी राष्ट्रवादीत प्रवेश करतो.
आम्ही सातत्याने उद्धव ठाकरेंना सांगत होतो की संजय राऊत साप आहे. हा ना बाळासाहेब ठाकरेंचा होऊ शकला ना तुमचा होणार. बाळासाहेब ठाकरे असताना संजय राऊतांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये भांडणं लावली. उद्या जेव्हा संजय राऊत राष्ट्रावदीत प्रवेश करतील तेव्हा त्यांचे मनसुबे उद्धऴ ठाकरेंना कळतील. या एका माणसामुळे तुम्ही किती लोकांना तोडलंत, असंही नितेश राणेंनी म्हटलं.
जेव्हा शरद पवारांनी राजीनामा दिला तेव्हा राहुल गांधी, एम. के. स्टॅलिन यांच्यापासून सगळ्या लोकांनी शरद पवारांना फोन केला आणि आपण राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. पण उद्धव ठाकरेंनी असा काही आग्रह धरला होता असं तुम्ही ऐकलंत का? उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा प्रयत्न संजय राऊत करत आहेत का? असाही प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला.





