राज्य सरकारची मोठी घोषणा!; चित्रपटांच्या अनुदानात दुप्पट वाढ
राज्यातील चित्रपटांना १ कोटी रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज तसेच राष्ट्रपुरुष, समाजसुधारक यांच्या कार्यावर तयार करण्यात आलेल्या राज्यातील चित्रपटांना यापूर्वी ५० लाख रुपये अनुदान देण्यात येत होते, आता हे अनुदान वाढून आता १ कोटी रुपयांपर्यंत देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे.
तसेच फक्त चित्रपटच नव्हे तर मालिकांनाही हे अनुदान देण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आपली संस्कृती जतन, संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगले कन्टेंट यावे यासाठी ५ तज्ज्ञ लोकांची समिती नुकतीच करण्यात आली आहे.
याशिवाय मराठीत दर्जेदार चित्रपट निर्मिती करणाऱ्यांना राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या अनुदानाचे वाटप नुकतेच करण्यात आले असून ४१ मराठी चित्रपटांना अनुदान देण्यात आल्याची मुनगंटीवार यांनी माहीती दिली.
दरम्यान कोल्हापूर चित्रनगरीत मालिका तसेच चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्याबरोबरच येत्या काळात चित्रनगरीचा कायापालट करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.