‘पैसे वाटप ही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संस्कृती आहे’; देवेंद्र फडणवीस यांचे धंगेकरांना प्रत्युत्तर
हा आरोप कसब्यातील सगळ्या मतदारांचा अपमान आहे
पुणे : कसबा मतदारसंघात मतदारांना मतांसाठी पोलिसांच्या उपस्थितीत भाजप नेते, पदाधिकारी लोकांना पैसे वाटत आहेत, असा आरोप रविंद्र धांगेकर यांनी केला. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रवींद्र धंगेकर यांच्या आरोपावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्पष्टपणे दिसून येत आहे की, आज कुठल्याही प्रकारचा प्रचार करता येत नाही हे माहित असताना अशा प्रकारचे स्टंट करून एक नवीन प्रकारे प्रचार करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पायाखालून जेव्हा वाळू निघून जाते त्यावेळी असे स्टंट केले जातात. हे आचार संहितेचे उल्लंघन आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पैसे वाटणे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची संस्कृती आहे. पैसे वाटणे ही भाजपची संस्कृती नाही. आमचा मतदारही असा नाही. जो पैसे घेऊन मतदान करेल. मतदारांचा अवमान करण्याचे काम आहे. धंगकर यांचं हे उपोषण भाजपविरूद्ध नाही तर हे उपोषण मतदारांच्या विरूद्ध आहे कारण ते मतदाकांना बिकावू ठरवत आहेत. हे अतिशय चुकीच आहे. देव त्यांना सुबूद्धी देवो, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, रविंद्र धंगकरांनी केलेला हा आरोप कसब्यातील सगळ्या मतदारांचा अपमान आहे, हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत, असं पुणे शहर भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी म्हटलं आहे.