ईव्हीएमचे बटन इतक्या जोरात दाबा की, अजित पवारांना करंट लागला पाहिजे- चंद्रशेखर बावनकुळे
!['Press the EVM button so hard that Ajit Pawar should be electrocuted'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/ajit-pawar-and-chandrashekhar-bawankule-780x470.jpg)
निवडणूक लढविणाऱ्यांमध्ये माणूसकी आहे की नाही?-चंद्रशेखर बावनकुळे
पिंपरी : पुण्यात कसबा विधानसभा मतदारसंघ आणि चिंचवड निवडणूची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनाने या पोटनिवडणूका होत आहेत. भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये काटे की टक्कर होणार अशाप्रकारचं चित्र आहे. उमेदवार विजयी करण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसलेली आहे. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी दिवसभर दौरा केला. दौरा संपल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना चिमटे काढले आहेत. 26 तारखेला इतक्या जोरात ईव्हीएमचे बटण दाबा की, असा 440 व्होल्ट्सचा करंट लागला पाहिजे. पुन्हा अजित पवारांनी चिंचवडचे नाव घेतले नाही पाहिजे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. अश्विनी जगताप यांच्या विरोधात काही लोक निवडणूक लढवत आहेत.
करंट देण्याची ताकद येथील लोकांमध्ये आहे. हा करंट देण्याची ताकद इथल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. कारण लक्ष्मण जगताप यांच्यासारख्या आमदाराचे निधन झाल्यावर त्यांच्या पत्नी या निवडणुकीसाठी उभ्या आहेत. अशावेळी निवडणूक लढविणाऱ्या लोकांमध्ये माणूसकी आहे की नाही?, असा प्रश्न उपस्थित करत चंद्रशेखर बावनकुळेंनी ईव्हीएमच्या बटनातून करंट द्यायला हवा, असा उपरोधिक टोला विरोधकांना लगावला आहे.
दरम्यान, चिंचवड मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. तर महाविकास आघाडीकडून नाना काटे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौरा केला होता. प्रत्येक निवडणूक ही गांभीऱ्याने घ्यायची असते,असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यातच आता ईव्हीएमच्या माध्यमातून विरोधकांना करंट लागला पाहिजे, असं भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी म्हटलेलं आहे.