“आंबेडकर यांचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही”; नाना पटोले

प्रकाश आंबेडकराना आम्ही प्रस्ताव दिला नाही
मुंबई : शिवसेना-ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युतीची उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी घोषणा केली. ही युती झाली तेव्हा आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्यास कोणतीही अडचण नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. प्रकास आंबेडकर हे आघाडीचा भाग असतील. त्याबाबत आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करू असं उद्धव ठाकरे म्हणले होते. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांच्याशी युती झाली असून आंबेडकर यांचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही. आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेण्याचा प्रस्तावही आमच्याकडे आलेला नाही. त्यामुळे आंबेडकर यांची महाविकास आघाडीतील एन्ट्री केवळ मनघडत कहाणी आहे, असं नाना पटोले म्हणाले.
शिवसेना आणि आंबेडकर एकत्र आले त्या दिवशी आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. आमच्याकडे प्रस्ताव नसल्यानं आम्हाला प्रतिक्रिया देण्याच काही काम नाही. प्रकाश आंबेडकराना आम्ही प्रस्ताव दिला नाही. त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे आला नाही, असंही नाना पटोले म्हणाले.
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबत मातोश्री निवासस्थानी बैठक झाली. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातच ही बैठक झाली. या बैठकीतून काँग्रेसला डावलण्यात आलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. येत्या २ तारखेला पोटनिवडणुकी संदर्भात महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. त्यात कोण कोणती जागा लढवणार हे स्पष्ट होईल, असंही पटोले म्हणाले.





