शिक्षण समिती सभापतींसह कार्यकारी अभियंत्यासाठी टाटांची झेस्ट गाडी खरेदी करणार
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती पदी सोनाली गव्हाणे यांची निवड होवून एक महिनाही झाला नाही. तोपर्यंत त्यांच्या दिमतीला नवी कोरी मोटार खरेदी करण्यात येणार आहे. याकरिता स्थायी समिती सभेत टाटा कंपनीची झेस्ट मोटार गाडी ही 5 लाख 58 हजार 642 रुपये किमतीची खरेदी केली जाणार आहे. हा विषय एेनवेळी मंजूर करण्यात आला.
महापालिकेत आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. महापालिका शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे यांच्या वापरात अॅम्बेसिडर मोटार होती. मोटारीचे आयुष्यमान 14 वर्ष आठ महिने इतके झाले आहे. मोटार दोन लाख 40 हजार 715 किलोमीटर धावली आहे. आता सभापती गव्हाणे यांच्यासाठी पाच लाख 58 हजार 642 रुपये किमतीचे नवीन टाटा झिस्ट मोटार खरेदी करण्यात येणार आहे. या मोटार खरेदीला स्थायी समितीने मंजुरी दिली.
दरम्यान, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसाठी देखील नवीन मोटार खरेदी करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठीही पाच लाख 58 हजार 642 रुपये किमतीची टाटा झिस्ट एक्स्टा मोटार खरेदी करण्यात येणार आहे.