जिल्हा परिषदांमधील भरतीला परवानगी

मुंबई: राज्यातील विविध जिल्हा परिषदांमधील सुमारे सहा हजारांहून अधिक रिक्त पदे भरण्यासाठी जानेवारी ते मे दरम्यान भरती मोहीम राबविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेतील गट ‘क’मधील सर्व संवर्गातील रिक्त पदांच्या ८० टक्के पदे जिल्हा निवड मंडळाच्या माध्यमातून भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात करोनामुळे मे २०२०मध्ये सरकारी नोकर भरतीवर बंदी घालण्यात आली होती. कालांतराने भरतीवरील ही बंदी मे महिन्यात उठविण्यात आल्यानंतर जिल्हा परिषदामधील गट ‘क’मधील सर्व रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सप्टेंबरमध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाशी सबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ.
आरोग्य पर्यवेक्षक अशी पदे भरण्यासाठी जिल्हा निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र शिंदे-फडणवीस सरकारे काही दिवसांपूर्वीच या प्रक्रियेला स्थगिती दिली होती. मंगळवारी या भरतीवरील स्थगिती उठविताना गट क मधील सर्व संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार वाहन चालक आणि शिपाई ही पदे वगळता अन्य सर्व पदे ८० टक्क्यांपर्यँत भरण्याची परवानगी जिल्हा परिषदांना देण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया जिल्हा परिषदेला जिल्हा निवड मंडळमार्फत राबविण्यास परवानगी देताना ग्रामविकास विभागाने भरतीचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. त्यानुसार १ते ७ फेब्रुवारी २०२३मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार असून एप्रिलमध्ये लेखी परीक्षा होणार आहे. संपूर्ण निवड प्रक्रिया मे अखेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत.




