पुणे-मुंबई महामार्गावर आंदोलन करणा-या 300 जणांवर गुन्हा
पिंपरी – मराठा मोर्चाच्या वतीने गुरुवारी (दि. 9) संपूर्ण महाराष्ट्र बंदचे आयोजन केले होते. त्यानिमित्त सर्व शहरांमध्ये ठिकठिकाणी मोर्चे काढून आंदोलन करण्यात येत होते. परंतु महामार्गावर बेकायदेशीरपणे आंदोलन करणा-या सुमारे 300 जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस नाईक हनुमंत कुंभार यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात पोलिसांच्या वतीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर बेकायदेशीरपणे आंदोलन करणा-या सुमारे 300 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. पथारी, टपरी चालकांपासून ते मोठ्या व्यावसायिकांपर्यंत सर्वांनी एक दिवसीय बंद पाळला. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश काढण्यात आले होते. कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर राधा चौक ते छत्रपती शिवाजी स्टेडियम बालेवाडी दरम्यान नागरिकांनी बेकायदेशीरपणे आणि विनापरवाना जमाव जमवून मोर्चा काढल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.