महाराष्ट्रात सत्तानाट्य घडत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना करोनाची लागण; रुग्णालयात दाखल
मुंबईः महाराष्ट्रात राजकरण ढवळून निघालं असताना आता राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राज्यपालांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात घडत असलेल्या सत्ता नाट्यात राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने सरकार संकटात आलं आहे. एकनाथ शिंदे यांना तब्बल ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर शिंदे समर्थक आमदारांचा वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, त्यापूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं राज्यातील सत्तानाट्याला वेगळं वळणं लागण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यपाल कोश्यारींना ताप येत होता. खबरदारी म्हणून त्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्या चाचणीचे आज अहवाल आले असून त्यांना करोना झाल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं आज सकाळीच राज्यपाल कोश्यारींना रिलायन्स रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, शिवसेना आमदारांसह अपक्ष आमदारांचीही साथ एकनाथ शिंदे यांना लाभली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करा, अशी या बंडखोर गटाची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे हे नाराज आमदारांचा स्वतंत्र गट स्थापन करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे भाजपला समर्थन देत असल्याचं पत्र देणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यापूर्वीच राज्यपाल कोश्यारींना रुग्णालयात दाखल केल्यामुळं आता ही प्रक्रिया अजून दोन ते तीन दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे.