‘मानवतेसाठी योग’हा विचार घराघरांत पोहोचला पाहिजे : शिवराज लांडगे
![The idea of 'Yoga for Humanity' should reach every household: Shivraj Landage](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/shivaraj-landge-1.jpeg)
भाजपा युवा मोर्चाच्या पुढाकारे योग शिबिराचे आयोजन
योगसाधना प्रचार, प्रसारासाठी युवकांनी घेतला पुढाकार
पिंपरी : ‘मानवतेसाठी योग’ही संकल्पना संपूर्ण जगासाठी २०२२ च्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हाती घेण्यात आली आहे. कोरोना संकटाचा समाना करीत असताना ‘योग फॉर ह्युमॅनिटी’याचे महत्त्व लक्षात येते. निरोगी शरीर आणि तणावमुक्त जीवनशैलीसाठी योगासाधना महत्त्वाची आहे, असे मत भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांनी व्यक्त केले.
भोसरी- गव्हाणे वस्ती येथील प्रभू रामचंद्र सभागृहात भाजपा युवा मोर्चा आणि पतंजली योग समितीच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे, सरचिटणीस दिनेश यादव, उदयग गायवाड, दत्ता गव्हाणे, जयदीप कर्पे, अमोल लांडगे, रोहन उगले, संदीप झंजाड आदी उपस्थित होते. गव्हाणे वस्ती आणि परिसरातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिराच्या आयोजनासाठी इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निलम लांडगे यांनीही पुढाकार घेतला.
शिवराज लांडगे म्हणाले की, २०१४ मध्ये युनायटेड नॅशनल जनरल असेंब्लीच्या ७९ व्या सत्रात भाषण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्याचा प्रस्ताव दिला होता. ११ डिसेंबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योग दिन प्रस्ताव ३ महिन्यांत बहुमताने स्वीकारण्यात आला आणि २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर जगभरात दरवर्षी २१ जून रोजी योग दिवस साजरा केला जातो. ही तमाम भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.