9 किलो सोने घेऊन चित्रपट निर्माता “वंटास’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/vantas-696.jpg)
पोलिसांनी ठोकल्या बेड्या : सापळा रचून मानखुर्द टी जंक्शन येथून अटक
मुंबई – “वंटास’ चित्रपटातून झालेल्या नुकसानीमुळे चित्रपटाचा निर्माता अमोल लवटे याने सोने व्यापाऱ्याचे 9 किलो सोने घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फरार होण्याआधीच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमोलला बेड्या ठोकल्या.
अमोल लवटे, संदीप लवटे, आप्पा घेरडे आणि पोपट आटपाडकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. काळबादेवी परिसरात अमोल लवटे हा भागीदारीमध्ये सोने गाळण्याचा व्यवसाय करतो. झवेरी बाजारातील एका व्यापाऱ्याने 21 जुलै रोजी त्याला नऊ किलो सोने गाळण्यासाठी दिले. व्यापाऱ्याने त्याच्या नोकराला सोने घेऊन पाठवले होते.
दरम्यान, नोकराला झोप लागली. याच संधीचा फायदा घेत अमोल त्याचा भाऊ संदीप लवटे, आप्पा घेरडे, पोपट आटपाडकर हे चौघे सोने घेऊन पसार झाले. त्यांनी जाताना गाळ्याची काडी बाहेरून लावून घेतली. जाग आल्यावर नोकराचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी दरवाजा उघडला. व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अमोल आणि त्याचे साथीदार मानखुर्द टी जंक्शनजवळ येत असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली.