जागा मालकीणीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
पिंपरी l प्रतिनिधी
जागेचे भाडे मागण्यासाठी गेलेल्या मालकिणीचा भाडेकरू आणि त्याच्या दोन साथीदारांनी विनयभंग केला. ही घटना 18 मे रोजी दुपारी साडेबारा वाजता जाधववस्ती ताथवडे येथे घडली.
ज्ञानेश्वर भाऊसाहेब जाधव (रा. औंध), योगेश दिलीप जाधव, निलेश दिलीप जाधव (दोघे रा. जाधववस्ती, ताथवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 52 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 28) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश्वर जाधव हा फिर्यादी यांची जागा भाड्याने वापरतो. त्याचे भाडे मागण्यासाठी फिर्यादी गेल्या असता ज्ञानेश्वर याने फिर्यादी महिलेला अश्लील शिवीगाळ करून गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. तसेच अन्य दोन आरोपींनी देखील फिर्यादीला अश्लील भाषेत बोलून त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बावधन येथे महिलेकडे शरीर सुखाची मागणी
बावधन येथे विनयभंगाचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 48 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आशिषकुमार वरजलाला लखतरिया (रा. बावधन खुर्द, पुणे. मूळ रा. अहमदाबाद) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. तसेच महिलेने नकार दिल्यास तिचे फोटो व्हायरल करण्याची आरोपीने धमकी दिली. फिर्यादिसोबत गैरवर्तन करत एक लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची आरोपीने धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.