पिंपरी / चिंचवड
गॅस चोरी प्रकरणी एकाला अटक; हिंजवडी पोलिसांची कारवाई
पिंपरी l प्रतिनिधी
मोठ्या गॅस सिलेंडर मधून गॅस काढून लहान टाक्यांमध्ये भरून चोरी केली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 18) दुपारी साडेतीन वाजता गंगारामवाडी, माण येथे करण्यात आली.
संजीव चौधरी (वय 43, रा. गंगारामवाडी, माण ता.मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगारामवाडी येथे 19.3 किलो आणि 14.5 किलो वजनाच्या मोठ्या गॅस सिलेंडर मधून लहान सिलेंडरमध्ये धोकादायकरीत्या गॅस चोरी करून काढायचा आणि तो सिलेंडर चढत्या दराने विकायचा, असा प्रकार आरोपी संजीव हा करत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी दुपारी साडेतीन वाजता छापा मारून कारवाई केली. त्यात आरोपीने गॅसची चोरी केल्याचे तसेच सिलेंडरची साठवणूक केल्याचे पोलीसांना आढळून आले. संजीव याला पोलिसांनी अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.