‘भारत’मध्ये झळकण्यास सुनील ग्रोवर इच्छुक ?
बराच काळ हॉलिवूडमध्ये घालविल्यानंतर मायदेशी परतलेल्या ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राने ‘भारत’ चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये प्रियांकाची चर्चा सुरु आहे. प्रियांकाने काम करण्यास नकार दिल्यानंतर दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनीही सूचक ट्विट करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र प्रियांकाने हा चित्रपट सोडल्यामुळे आता पुन्हा एकदा नव्या नायिकेचा शोध सुरु झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये झळकण्यासाठी छोट्या पडद्यावरील विनोदवीर सुनील ग्रोवरने उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.
प्रियांकाने एका खास आणि वैयक्तिक कारणामुळे हा चित्रपट सोडल्यामुळे चित्रपटाची संपूर्ण टीम नव्या अभिनेत्रीच्या नावाचा विचार करत आहे. त्यामुळे सध्या जॅकलीन फर्नांडिस आणि कतरिना कैफ यांच्या नावाचा विचार सुरु आहे. मात्र सुनीलने एका मजेशीर अंदाजामध्ये ‘मी या चित्रपटात अभिनेत्रीची भूमिका करण्यास तयार असल्याचं’, म्हटलं आहे.
सुनीलचा हा मजेशीर अंदाजामधील व्हिडिओ तुफान फिरत असून या व्हिडिओमध्ये तो एका नौटंकी स्टाईलमध्ये चित्रपटात काम करण्यास अप्लाय करत आहे. ‘भारत’ चित्रपटामध्ये अभिनेत्रीची जागा रिकामी आहे, असं माझ्या ऐकण्यात आलं आहे. त्यामुळे या चित्रपटातील पात्राला मी उत्तम प्रकारे न्याय देऊ शकतो असं वाटतं. याच कारणामुळे मी अर्ज करत आहे. किती टक्के भारतीयांना वाटतं मी ‘भारत’ची अभिनेत्री व्हावं’ ?असं या व्हिडिओ सुनील म्हणत आहे.
दरम्यान, सुनीलने जरी हा व्हिडिओ अपलोड केला असला तरी या चित्रपटामध्ये आता नक्की कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.