सोशल मीडिया ग्रुपवर खोटी माहिती देऊन २२ लाख ४० हजारांची फसवणूक
पिंपरी l प्रतिनिधी
सोशल मीडिया ग्रुपवर नायट्रेल ग्लोज होलसेल विक्रीसाठी असल्याचे सांगून बनावट इनव्हाईस बनवून २२ लाख ४० हजारांची फसवणूक केली. ही घटना २० जुलै २०२० ते १६ एप्रिल २०२२ या कालावधीत हिंजवडी येते घडली.
रोहित रामकिशोरजी सोमानी (वय ३२, रा. बावधन, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिनर्जीक ट्रेलर व ऑटो सोल्युशन प्रा ली कंपनी दिल्लीचे संचालक रंजन भगवानदास साबू (रा. नवी दिल्ली), विनयकुमार काबरा (रा. निगडी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून समाजाच्या ‘मंथली रेफरल मीट’ या व्हाट्सअप ग्रुपवर त्यांच्याकडे नायट्रेल ग्लोज होलसेल विक्रीसाठी उपलब्ध असल्याची खोटी माहिती दिली. फिर्यादी यांच्याशी गोडगोड संपादन करून पाच हजार ग्लोज बॉक्स पाठविण्याच्या मोबदल्यात फिर्यादीकडून २२ लाख ४० हजार रुपये घेतले. तसेच माल पाठवल्याचे बनावट इनव्हाईस तयार करून पाठवले. मात्र अद्याप फिर्यादी यांना माल मिळाला नाही. आरोपींनी त्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.