दारू पिण्यासाठी मागितली खंडणी : पैसे देण्यास नकार दिल्याने बियरच्या बाटलीने मारहाण
पिंपरी l प्रतिनिधी
दोघांनी एका तरुणाकडे दारू पिण्यासाठी खंडणी मागितली. पैसे देण्यास तरुणाने नकार दिला असता दोघांनी तरुणाला आणि त्याच्या मित्रांना शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी, प्लास्टिक पाईप आणि बियरच्या बाटलीने मारहाण केली. ही घटना फेब्रुवारी 2022 ते 10 एप्रिल 2022 या कालावधीत समता कॉलनी, वराळे येथे घडली.
रवी शाम बुले (वय 23, रा. वराळे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल जगन जाधव (रा. समता कॉलनी, वराळे, ता. मावळ) आणि कुमार मोहिते (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांकडे दारू पिण्यासाठी व मौजमजा करण्यासाठी वेळोवेळी दमदाटी करून पैशांची मागणी केली. फिर्यादी यांनी आतापर्यंत आरोपींना 300 रुपये दिले होते. 1 एप्रिल रोजी आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांकडे प्रत्येकी एक हजार रुपये असे पाच मित्रांकडून पाच हजार रुपये खंडणी मागितली. खंडणीचे पैसे न दिल्याने आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ, दमदाटी करून प्लास्टिक पाईप आणि बियरच्या बाटलीने मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या घरातील साहित्याचे नुकसान केले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.