एक्सलन्स् ऍकॅडमी व क्रीडा प्रबोधिनी यांच्यात अंतिम लढत
- अजितदादा चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धा
पुणे: एक्सलन्स् ऍकॅडमी व क्रीडा प्रबोधिनी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून अजितदादा चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर पिंपरी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एक्सलन्स् ऍकॅडमी संघाने आयकर विभाग संघाचा, तर
क्रीडा प्रबोधिनी संघाने मुंबई रिपब्लिकन्स् संघाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
पहिल्या उपान्त्य लढतीत एक्सलन्स् ऍकॅडमी संघाने आयकर विभाग संघाचा टायब्रेकरमध्ये 3-2 असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. निर्धारित वेळेअखेर 3-3 अशा बरोबरीनंतर प्रिन्स्, नवीन के. व युवराज वाल्मिकी यांनी गोल करताना एक्सलन्स ऍकॅडमीला विजयी केले. आयकर संघाकडून केवळ सूरज जानी व विक्रम सिंग यांनाच गोल करता आले.
दुसऱ्या उपान्त्य लढतीत क्रीडा प्रबोधिनी संघाने मुंबई रिपब्लिकन्स् संघावर 2-1 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. यामध्ये अनिकेत गुरव आणि रालेब शहा यांनी गोल करताना क्रीडा प्रबोधिनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मुंबई रिपब्लिकन्स संघाकडून केवळ प्रणित नाईकने एकमेव गोल केला.
त्याआधी आयकर विभाग व मुंबई रिपब्लिकन्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा वेगवेगळ्या शैलीत पराभव करताना अजितदादा चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला होता.
पहिल्या चुरशीच्या सामन्यात आयकर विभाग संघाने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संघाचा सडन डेथमध्ये पराभव करून उपान्त्य फेरीत आगेकूच केली होती. तसेच दुसऱ्या उपान्त्यपूर्व सामन्यात मुंबई रिपब्लिकन्स संघाने जीएसटी अँड कस्टम संघाचा टायब्रेकरमध्ये पराभव करून उपान्त्य फेरी गाठली होती.