अल्पवयीन बालिकेवरील बलात्कार प्रकरणी 19 वर्षीय आरोपीला फाशीची शिक्षा
जयपूर– अल्पवयीन बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी 19 वर्षीय आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. 7 महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार केल्याबद्दल या आरोपीला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या आरोपीने पाळणाघरातून या बालिकेला बरोबर नेले होते. पालकांनी शोध घेतल्यावर ही बालिका घरापासून एक किलोमीटर अंतरावरील फुटबॉलच्या मैदानात रडत असलेली आढळली. बालिकेच्या वैद्यकीय तपासणीनंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. तपासानंतर 19 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली होती. जलदगती न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी झाली आणि आरोपीला दोषी ठरवण्यात आले.
राजस्थानच्या विधानसभेत संमत झालेल्या नवीन कायद्यानुसार ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांच्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यासाठी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात करण्याचे विधेयक राजस्थानच्या विधानसभेमध्ये मार्च महिन्यातच मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार फाशीची शिक्षा सुनावली जाण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. अल्पवयीन बालकांच्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद देशात सर्वप्रथम मध्यप्रदेशने डिसेंबरमध्ये आणि त्यानंतर राजस्थानात यावर्षी मार्च महिन्यात करण्यात आली आहे.