आर्थिक व्यवहारातून तिघांना मारहाण : महिलेचा विनयभंग
पिंपरी | प्रतिनिधी
आर्थिक व्यवहारातून सात जणांनी मिळून तिघांना मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 19) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास च-होली खुर्द येथे घडली.
नितीन गोविंद साठे, लक्ष्मी नितीन साठे, जितु गोविंद साठे, गोविंद साठे, नितीन साठेची आई, नितीन साठेची आत्या, सुरज साबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन आणि फिर्यादी यांचे पती यांच्यात आर्थिक व्यवहार होते. त्यातून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून त्यांच्या पतीला हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नितीन याने दगडाने मारले. याचा व्हिडीओ फिर्यादी यांच्या दिराने काढला. त्यावेळी नितीनच्या आत्याने मोबाईल हिसकावून घेत मारहाण केली. ‘आमची येथे दहशत आहे. आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही. तुमच्याकडे पाहून घेऊ’ अशी धमकी दिली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.