शेतात काम करत असलेल्या दोघांना मारहाण ; पाच जणांवर गुन्हा दाखल, तिघांना अटक
पिंपरी l प्रतिनिधी
शेतात काम करत असलेल्या दोघांना पाच जणांनी मिळून बेदम मारहाण केली. पोकलेन मशीनवर दगड मारून मशीनचे नुकसान केले. ही घटना मंगळवारी (दि. 15) सकाळी आठ वाजता अहिरेगाव, ता. खेड येथे घडली.
रामचंद्र गेनू आहेरकर, सोपान रामचंद्र आहेरकर (वय 60), नारायण रामचंद्र आहेरकर (वय 54), रामदास भाऊ आहेरकर, सचिन मधु आहेरकर (वय 28, सर्व रा. आहेरगाव, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सोपान, नारायण आणि सचिन या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
कुंडलिक एकनाथ ओझरकर (वय 40, रा. रौंधळवाडी, ता.खेड), रामेश्वर नागू हुलगुंडे (रा. गाणेगाव, घनसांगवी, जालना) अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कुंडलिक यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी फिर्यादी हे त्यांचे दाजी दत्तात्रय येळवंडे यांच्या शेतात जमीन सपाट करण्याचे काम करत होते. रामेश्वर हे पोकलेन मशीन चालवत होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. आरोपींनी पोकलेन मशीनवर दगड मारून नुकसान केले. त्यानंतर पोकलेन चालक रामेश्वर यांना आणि फिर्यादी यांना दगडाने मारून भीती दाखवून घाबरवून पळवून लावले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.