किरकोळ कारणावरून रूममेटवर सुरीने वार
पिंपरी l प्रतिनिधी
एकाच खोलीत राहणा-या दोन मित्रांमध्ये भांडण झाले. मित्र आपल्या जागेवर त्याचे अंथरून टाकत असल्याचे पाहून दुस-या मित्राने त्याच्यावर सुरीने वार करून जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 12) रात्री आठ वाजता ताथवडे येथे घडली.
दिनेश गोपाल गौंड (वय 35, रा. बालवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राजू रतनलाल माला (वय 36, रा. ताथवडे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच खोलीत भाड्याने राहतात. शनिवारी रात्री आठ वाजता फिर्यादी अंथरून टाकत होते. त्यावेळी आरोपीने ‘माझ्या जागेवर तू का अंथरून टाकत आहेस, असे म्हणून फिर्यादी यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून आला. त्यानंतर सुरीने फिर्यादी यांच्या मानेवर, छातीवर मारून त्यांना किरकोळ जखमी केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.